कोवाड / सी एल वृत्तसेवा :
आमदार प्रकाश रावजी आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' या उपक्रमांतर्गत निट्टूर (ता. चंदगड) येथे चार सूत्री भात रोपलागवड प्रात्यक्षिकासह वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
नरसिंह हायस्कूल, निट्टूर येथील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शालेय विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला, तर चार सूत्री भात रोपलागवडीच्या प्रात्यक्षिकातून आधुनिक व शास्त्रीय शेती पद्धतीची माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या मानसीताई भोगण, पंचायत समिती सदस्या सुवर्णा चंद्रकांत कुंभार, निट्टूरचे सरपंच गुलाब पाटील, ग्रामविकास अधिकारी विनायक पुजारी, सहाय्यक कृषी अधिकारी प्रियांका डफरे, आरोग्य सेवक अमित लोहार तसेच कृषी सखी वर्षा लोंढे उपस्थित होते.
शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे कर्यात परिसरातील बळीराजाकडून विशेष स्वागत होत असून, अशा उपक्रमांमुळे शाश्वत शेतीला निश्चितच चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment