'शिव चातुर्य दिन, आग्रा ते राजगड गरुड झेप मोहिमेची ११ व्या दिवशी राजगड किल्ल्यावर सांगता, शिवरायांचा जयजयकार, मर्दानी खेळ, ढोल ताशांच्या निनादात दऱ्याखोऱ्या दुमदुमल्या - चंदगड लाईव्ह न्युज

29 August 2026

'शिव चातुर्य दिन, आग्रा ते राजगड गरुड झेप मोहिमेची ११ व्या दिवशी राजगड किल्ल्यावर सांगता, शिवरायांचा जयजयकार, मर्दानी खेळ, ढोल ताशांच्या निनादात दऱ्याखोऱ्या दुमदुमल्या

 

शिव चातुर्य दिनानिमित्त पोस्ट खात्याने काढलेले स्पेशल पाकीट

संपत पाटील / चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   'शिव चातुर्य दिन, गरुड झेप मोहीम' (पर्व ७ वे) आग्रा ते राजगड पायी मशाल दौड व सायकल रॅलीची राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या खंडोबा माळावर गुरुवार दि. २७/०८/२०२६ रोजी अभूतपूर्व उत्साहात सांगता झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, शंभूराजे यांचा जयघोष, भंडाऱ्याची उधळण, ढोल-ताशांचा गजर, युद्ध कला व मर्दानी खेळ, ढोल ताशांच्या गजराने स्वराज्याची पहिली राजधानी राजगड व परिसरातील दरीखोरी दुमदुमून गेली. 

आग्रा येथील कार्यक्रमात सहभागी झालेले चंदगड मधील पत्रकार सोबत गोवा येथील ओमिडा फिटनेस ग्रुपचे कलाकार

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सर्वाधिक महत्त्वाची घटना म्हणजे आग्रा येथे झालेली राजे व मुघल बादशहा औरंगजेब भेट. या भेटी वेळी औरंगजेबाने दगलबाजी करत शिवरायांना नजर कैदेत टाकून ते निसटून जाऊ नये यासाठी लाखोंच्या फौजेचा पहारा ठेवला होता. तथापि ९९ दिवसांच्या कैदेतून महाराजांनी आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर औरंगजेबाच्या कैदेतून सुटून याची देही राजगड गाठला. मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी जागतिक इतिहासातील ही अजरामर घटना १७ ऑगस्ट १६६६ रोजी घडली.

मोहिमेत चार चाकी वाहने चालवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून सेवा दिलेले शिवप्रेमी चालक

  या दिवसाच्या स्मृतिप्रत्यर्थ गेल्या ७ वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळ प्रमुख सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज ॲड. मारुती उर्फ आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली शिव चातुर्य दिन- गरुड झेप मोहिमेचे आयोजन केले जाते.  १७ ऑगस्ट रोजी सकाळी शेकडो शिवप्रेमींचा सहभाग असलेली आग्रा ते राजगड पायी मशाल दौड व सायकल रॅली अग्रा येथील लाल किल्ल्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास जलाभिषेक व पूजन करून सुरू होते. तत्पूर्वी 16 ऑगस्ट रोजी आग्रा येथे महाराष्ट्र व उत्तर प्रदेश राज्यातील मंत्री व मान्यवरांचे उपस्थितीत भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यंदा या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आग्रा शहरात लवकरच उभारण्याची ग्वाही दिली असून त्या दृष्टीने वाटचाल सुरू झाल्याचे समजते. आग्रा कॉलेज आग्रा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी गोवा येथील ओमीडा डान्स अँड फिटनेस ग्रुपच्या वतीने आयोजित 'शिव शौर्यगाथा' नाटकास आग्रा येथील शिवप्रेमी रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

राजगड येथे पर्यावरण प्रेमी गणेशराव गोळे व अन्य सहभागी मावळ्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले

  दिनांक १७ रोजी सकाळी सुरू झालेली रॅली १३१० किलोमीटर अंतर ४ राज्ये व ७८ शहरे, गावे पार करत दहा मुक्कामानंतर अकराव्या दिवशी किल्ले राजगड येथे पोहोचली.  २७ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत राजगडच्या पायथ्याशी मोहिमेची जल्लोषात सांगता झाली. यावेळी जिल्हा परिषद प्राथ. शाळा गोरे खुर्द चे लेझीम पथक, आग्र्यापासून मोहिमेत शेवटपर्यंत असलेले हिंदू तेज मर्दानी आखाडा यांचे मर्दानी खेळ लक्षवेधी ठरले. या वेळी गरुड झेप मोहिमेचे संस्थापक मारुती गोळे, कांचन कुल, खानापूरचे उपसरपंच विश्वनाथ जावळकर, श्रीहरी मारणे, रामचंद्र देवकर, दिग्विजय जाधव, पाल बुद्रुकचे सरपंच गोरक्ष शिर्के, अण्णा रेणुसे आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांच्या वेशभूषेतील कलाकार, सोबत पत्रकार व शिवभक्त

 ११ दिवस चाललेल्या मोहिमेत सुमारे अडीच हजार शिवप्रेमींनी सहभाग घेतला. यात २२५० धावपटू, ५७ सायकलपटू , १२ चार चाकी चालक, अनेक दुचाकीस्वार यांचा समावेश होता. मार्गावरील गावे व शहरात रॅलीचे उत्साही स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणच्या शिवप्रेमी नागरिक व संघटनांनी रॅलीमध्ये सहभाग दाखवलाच पण सकाळचा चहा, नाष्टा, दुपारचे जेवण रात्रीचे जेवण मुक्कामाची व्यवस्था करून मोहिमेतील शिवभक्तांना सहकार्य केल्याची माहिती ॲड. मारुती गोळे यांनी दिली.दरम्यान मोहिमे सोबत मेहकर (जिल्हा बुलढाणा) येथील पर्यावरण प्रेमी गणेशराव गोळे यांनी वृक्षारोपण व पर्यावरणाचा संदेश देत विविध फळझाडांची शेकडो रोपे तसेच दोन पोती बिया मोहीमे वरील मार्ग व परिसरात लावून पर्यावरणाचा संदेश दिला. 

    दि. १६ व १७ ऑगस्ट रोजी आग्रा येथे झालेल्या शिव चातुर्य दिन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्याचा पहिला मान चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित 'सी एल न्यूज चॅनेलला' मिळाला. या थेट प्रक्षेपणासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मधून पाच पत्रकारांचे पथक आग्रा येथे दाखल झाले होते. मोहिमेला मिळालेल्या व्यापक प्रसिद्धीमुळे  सर्वच स्तरातून या मोहिमेतील सहभाग वाढल्यामुळे कार्यक्रमाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. ही उत्तरोत्तर आणखी वाढत जाणार यात शंका नाही.

No comments:

Post a Comment