ठाणे / विशेष वृत्तसेवा :
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील दहीहंडी उत्सवाला ठाण्यात यंदा भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे. ठाणे भाजपा प्रणित स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने ‘स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले असून, यंदाच्या महोत्सवात तब्बल ७१ लाख रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील गोविंदा पथकांमध्ये या महोत्सवाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकारातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
दहीहंडीचा थरार हा केवळ उत्सवापुरता मर्यादित नसून, त्यामागे गोविंदा पथकांची वर्षभराची मेहनत, सराव, जिद्द आणि साहस दडलेले असते. या कष्टांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने स्वामी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले जाते. ‘सेलिब्रिटी हंडी’ म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झालेल्या या सोहळ्याला राजकीय, सामाजिक तसेच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभते.
राजकीय व मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महोत्सवाला विशेष उपस्थिती लावली होती. अभिनेता सुनील शेट्टी, गायक-अभिनेते अवधूत गुप्ते, अंकुश चौधरी, समीर चौघुले, सुशांत शेलार, संदीप पाठक, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार तसेच नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकारांनी दहीहंडीची रंगत वाढवली होती.
यंदाच्या महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्यासह विविध राजकीय नेते तसेच हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
सामाजिक बांधिलकीही जपली
भव्य दहीहंडी आयोजनासोबतच स्वामी प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकीचे भानही जपले आहे. सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गरजू नागरिक, आदिवासी, महिला, शेतकरी आणि आपत्तीग्रस्तांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
आदिवासी शाळांना संगणक, प्रोजेक्टर आणि प्रिंटर उपलब्ध करून देणे, दहा आदिवासी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणे, युद्धात सहभागी झालेल्या सैनिकांचा सन्मान करणे तसेच शेतकऱ्यांना शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविता यावा यासाठी आठवडे बाजाराची कायमस्वरूपी व्यवस्था उपलब्ध करून देणे, असे विविध उपक्रम प्रतिष्ठानने हाती घेतले आहेत.
चंदगडमध्येही विविध सामाजिक उपक्रम
चंदगड विधानसभा मतदारसंघातील सुमारे ७५ हजार महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या कोल्हापूर व माळीण येथील विस्थापित नागरिकांना मदत करण्यात आली असून, त्यांच्या घरांच्या पुनर्बांधणीसाठीही भरीव मदत देण्यात आली आहे.
चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाममधील ५५ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर होण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्यात आला. यासाठी ७/१२ चलनांची रक्कमही स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने भरण्यात आली आहे.
एक लाखांहून अधिक गोविंदांचा सहभाग
सन २०१८ पासून ठाण्यात स्वामी प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी महोत्सवाचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत ४५० हून अधिक नोंदणीकृत गोविंदा मंडळांतील एक लाखांहून अधिक गोविंदांनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असल्याची माहिती आयोजक आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली.
भव्य बक्षिसे, मोठ्या संख्येने सहभागी होणारी गोविंदा पथके आणि देश-विदेशातील माध्यमांचे लक्ष वेधून घेणारा हा महोत्सव यंदाही त्याच जोशात रंगणार आहे. त्यामुळे ‘स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव २०२६’ हा ठाणे शहरासह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा उत्साहाचे भव्य दर्शन घडविणारा सोहळा ठरणार आहे.
— चला, सामील होऊया या उत्सवात!

No comments:
Post a Comment