बेळगाव / सी एल वृत्तसेवा
भाषावार प्रांतरचनेत सीमा भागातील मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव येथे भव्य सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीत सीमा भागातील मराठी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
१ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार विविध भाषिक राज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी बेळगाव, कारवार आणि बिदर येथील मराठी भाषिक प्रदेश अन्यायाने तत्कालीन म्हैसूर राज्यात (सध्याचे कर्नाटक) समाविष्ट करण्यात आला. या निर्णयाविरोधात तसेच सीमा भागातील मराठी जनतेची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी १९५६ पासून दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्यात येतो.
गेली ७० वर्षे सीमा भागातील मराठी जनता विविध मार्गांनी आपल्या भावना आणि असंतोष व्यक्त करीत आहे. सत्याग्रह, साराबंदी, हरताळ, बंद, मेळावे, निदर्शने आणि मोर्चे अशा माध्यमांतून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक वेळा आश्वासने मिळूनही सीमाप्रश्न अद्याप प्रलंबित आहे. महाराष्ट्र सरकारनेही या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करून कायदेशीर लढा सुरू ठेवला आहे.
सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढ्याबरोबरच रस्त्यावरील लोकशाही मार्गाने सुरू असलेला लढाही तितकाच महत्त्वाचा आहे. याच लढ्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने सायकल फेरीचे आयोजन केले आहे.
१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता बेळगाव येथील संभाजी उद्यानातून सायकल फेरीला प्रारंभ होणार आहे. या फेरीत मराठी भाषिक नागरिक, युवक, कार्यकर्ते आणि सीमा भागातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्रात सामील होण्याची आपली भावना पुन्हा एकदा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment