पुणे- कोवाड खाजगी ट्रॅव्हल्सचे ब्रेक फेल, वीस प्रवासी बचावले, गारगोटी- गडहिंग्लज मार्गावरील मांगणूर घाटातील थरार - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2025

पुणे- कोवाड खाजगी ट्रॅव्हल्सचे ब्रेक फेल, वीस प्रवासी बचावले, गारगोटी- गडहिंग्लज मार्गावरील मांगणूर घाटातील थरार


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
   पुणे- कोवाड ही इंदुमती ट्रॅव्हल्स ची खाजगी बस काल ब्रेक फेल झाल्याने अपघातग्रस्त झाली. ड्रायव्हरचे प्रसंगावधान व गाडीतील प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणूनच मोठा अपघात टळला. एक चित्त थरारक घटना काल दिनांक २६/०४/२०२५ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास गारगोटी गडहिंग्लज मार्गावर घडली. बस मधून चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथील दोन प्रवासी प्रवास करत होते.

   याबाबत घटनास्थळ व प्रवासी वर्गातून समजलेली अधिक माहिती अशी, इंदुमती ट्रॅव्हल्स या खाजगी बस दररोज कोवाड ते पुणे व पुणे ते कोवाड फेऱ्या मारते. काल पुण्याहून कोवाड कडे येताना गारगोटी गडहिंग्लज मार्गावरील पाल, मांगणूर घाटा दरम्यान तीव्र उतार व वळणावर या बसचे ब्रेक झाल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने. ड्रायव्हर व प्रवासी वर्गात एकच खळबळ उडाली. काही क्षण गाडीतील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. तथापि गाडीवरील ड्रायव्हरने गाडी सरळ न नेता बाजूच्या शिवारात घुसवली. शेतातील मातीमुळे गाडी पुढे जाऊ शकली नाही. गाडी सरळ पुढे गेली असती तर वळणाच्या पुढील कित्येक फूट खोल जाऊन पडली असती. अशावेळी बस व बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची काय अवस्था झाली असती! याची कल्पनाच केलेली बरी. या केवळ कल्पनेनेच प्रवाशांच्या काळजाचा थरकाप उडाला.
   चंदगड, आजरा, गडहिंग्लज मारले तालुक्यातून गारगोटी मार्गे रोज शेकडो खाजगी ट्रॅव्हल्स पुणे, मुंबईकडे जात जातात. तथापि कालच्या घटनेवरून या गाड्यांची कंडिशन कशी असते, याचा एक नमुना समोर आला आहे. अशा गाड्यांमुळे मोठे अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.   आपल्या हक्काच्या राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस दुर्लक्षित करून खाजगी वाहनातील प्रवास प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतो. याची जाणीव अशा प्रवाशांनी ठेवण्याची गरज असल्याचे मत प्रवासी वर्गातूनच होत आहे.

No comments:

Post a Comment