वाचन चळवळीला बळ देणारा वाढदिवस, कु.वैष्णवी गावडेकडून विद्यालयास ४ हजारांची पुस्तके भेट! - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2025

वाचन चळवळीला बळ देणारा वाढदिवस, कु.वैष्णवी गावडेकडून विद्यालयास ४ हजारांची पुस्तके भेट!

 


चंदगड / सी एल वृत्तसेवा

     "चॉकलेट नको, पुस्तक हवे" या शाळेतील उपक्रमाला दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथील इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी कु. वैष्णवी गावडे हिने दिला मनापासूनचा पाठिंबा. आपल्या वाढदिवसानिमित्त तिने चॉकलेट पार्टी वा मौजमजेला बाजूला ठेवत थेट विद्यालयाला तब्बल ४,००० रुपयांची वाचनीय पुस्तके भेट दिली.

वैष्णवीच्या या उपक्रमशील आणि समाजभिमुख कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. "वाढदिवस हा फक्त सेलिब्रेशनचा नव्हे, तर इतरांसाठी काहीतरी देण्याचा दिवसही असू शकतो," हे तिने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

शाळेने राबवलेल्या ‘चॉकलेट नको, पुस्तक हवे’ या अभियानाला असे विद्यार्थ्यांकडून मिळणारे सहकार्य हे खरोखरच प्रेरणादायी आहे. वैष्णवीने दिलेली पुस्तके आता शाळेतील वाचनालयाचा भाग बनणार असून अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. वर्ग शिक्षक संजय साबळे व ग्रंथपाल शरद हदगल यांचे तीला मार्गदर्शन मिळाले.

शाळेचे मुख्याध्यापक आर. पी. पाटील यांनी तीच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक करून अभिनंदन केले. यावेळी कार्यक्रमाला टी. एस. चांदेकर, एम. व्ही. कानूरकर, टी. व्ही. खंदाळे, जे. जी. पाटील, डी. जी. पाटील, टी. टी. बेरडे बी. आर. चिगरे उपस्थित होते. आभार बी. आर. चिगरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment