पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात दोन म्हशी ठार, कोठे घडली घटना...... - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2025

पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात दोन म्हशी ठार, कोठे घडली घटना......

 

चंदगड / सी एल वृत्तसेवा

      चंदगड तालुक्यातील जांबरे येथील तुकाराम गावडे जनावरांना घेऊन जंगलात चारण्यासाठी गेले असता पट्टेरी वाघाने अचानक हल्ला केल्याने एक दुबती म्हैस व एक रेडी अशा दोन जनावरांवर हल्ला केला. यात दोन म्हशींचा मृत्यू झाला.

        जांबरे गावालगतच हंगाम प्लॉट नावाच्या सर्व्हे नंबरात तुकाराम गावडे सकाळच्या सत्रात आपल्या म्हशींना चारण्याकरता गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास अगदी समोरच मोठा पट्टेरी वाघाने तीन वर्षाच्या रेडीवर हल्ला केला. हे पाहून तुकाराम गावडे घाबरून गेले. आरडाओरड केल्यानंतर वाघाने रेडीला सोडले व निघून गेला. जखमी झालेल्या जनावराकडे बघतच त्याच ठिकाणी तुकाराम गावडे थांबले. तोपर्यंत दुबती म्हैस बाजूला गेली होती. पुन्हा वाघाने येऊन म्हशीवर हल्ला केला. व तिलाही ठार मारले. भेदरलेल्या अवस्थेत असलेले तुकाराम यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील काही युवक जमा झाले. गावचे पोलीस पाटील जानकू पाटील यांनी गोष्टीची माहिती वनविभागला दिली. दुभत्या जनावरावर हल्ला करून वाघाने ठार मारल्याने दीड लाख रुपयाचे तुकाराम गावडे यांचे नुकसान झाले आहे.

      झांबरे, वाघोत्रे या परिसरात वाघ असल्याचे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे. यापूर्वीही हेरे गावाशेजारी गेल्या दोन महिन्याच्या अगोदर अशाच प्रकारे दोन म्हैशींचा फडशा पट्टेरी वाघाने पाडला होता. वारंवार या घडणाऱ्या गोष्टींमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सोमवार दुपारी तीन वाजता वनविभागाचे अधिकारी पंचनाम्या करिता आले असल्याची माहिती देण्यात आली. गावातील नागरिकांनी नुकसान भरपाई देऊन सहकार्य करावे, अशी मागणी आहे. वनविभागाकडे केली.

No comments:

Post a Comment