तोडणी व वाहतूक कंत्राटदार यांना आगाऊ धनादेश वाटप करताना चेअरमन मानसिंग खराटे व कारखान्याचे अधिकारी
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील अग्रगण्य अथर्व- दौलत साखर कारखान्याने आगामी २०२५-२६ गळीत हंगामासाठी सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखाना कार्यस्थळावर आयोजित तोडणी वाहतूकदारांना ॲडव्हान्स चेक वाटप कार्यक्रम प्रसंगी जाहीर केले. यावेळी चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या हस्ते तोडणी वाहतूक कराराचे ॲडव्हान्स चेक चे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, संचालक विजय पाटील, मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील, लेबर ऑफिसर अश्रू लाड आदी मान्यवरांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विजय मराठे म्हणाले चेअरमन खराटे यांच्या कुशल मार्गदर्शन व प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर येता गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वच स्तरावर नियोजन केले आहे. गत हंगामात अति पावसामुळे उत्पादनात घट आली. परिणामी अपेक्षित गाळात होऊ शकले नाही. तथापि यंदा कार्यक्षेत्रात उसाचे पीक चांगले असल्याने कारखाना वेळेत सुरू करू. शेतकऱ्यांचाही अथर्व व्यवस्थापनावर विश्वास वाढल्याने ते अधिकाधिक ऊस आपल्या कारखान्याला देऊन सात लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास हातभार लावतील असा विश्वास व्यक्त केला.
चेअरमन मानसिंग खोराटे म्हणाले साखर उद्योगाला सध्या विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. तरीपण शेतकऱ्यांची ऊस बिले, कामगारांचे पगार, तोडणी वाहतूकदारांची बिले यासारख्या गोष्टी वेळेत पूर्ण करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. ती आपण यापूर्वीही पार पडली असून भविष्यातील बिले वेळेत देण्याची ग्वाही यावेळी दिली. कारखाना कार्यक्षेत्राचा भौगोलिक दृष्ट्या अभ्यास करून येत्या काळात 'एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कारखाना प्रशासन योग्य ती पावले उचलणार आहे. याबाबतचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मेळावा, विकास परिषदेतून केले जाईल. दौलत कारखाना शेतकऱ्यांच्या विश्वासावरच आज पर्यंत उभा आहे. शेतकऱ्यांच्या सोबतीला तोडणी व वाहतूक कंत्राटदार, कामगार यांचे पूर्ण सहकार्य आपल्या पाठीशी असून या सगळ्यांच्या जोरावर यंदा उच्चांकी गाळप करून कारखाना राज्यात अव्वल ठरेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
ॲडव्हान्स चेक वाटप कार्यक्रमामुळे कारखाना प्रशासनाच्या कार्यपद्धती बाबतीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र कारखाना कार्यस्थळावरील कार्यक्रम प्रसंगी दिसत होते. यावेळी शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदार मधुकर करडे, रामा वांद्रे, सागर पाटील, संजय सुरुतकर, सचिन देसाई, राजेंद्र फाटक, कृष्णा पाटील, जोतिबा पाटील, राजाराम लांडे, परशराम नाईक आदींसह शेतकरी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी स्वागत केले तर अश्रू लाड यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment