सावधान..! चाळोबा गणेश हत्ती झालाय आक्रमक, मोटर कार, रसवंतीगृह फोडून आत्ता बुक्किहाळ परिसरातील ऊस, केळीच्या बागा, ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाडीचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

23 May 2025

सावधान..! चाळोबा गणेश हत्ती झालाय आक्रमक, मोटर कार, रसवंतीगृह फोडून आत्ता बुक्किहाळ परिसरातील ऊस, केळीच्या बागा, ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाडीचे नुकसान

  

चाळोबा गणेश हत्ती आक्रमक झाल्यानंतर त्याने ट्रॅक्टर ट्रॉली उलटवून टाकली. 

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

       गेल्या चार दिवसात चंदगड तालुक्याच्या पूर्व सीमेलगतच्या कर्नाटक सीमा बेकिनकेरे, अतिवाड, देवरवाडी, उचगाव, कालकुंद्री, कागणी आदी भागात धुमाकूळ घातलेल्या चाळोबा गणेश नावाच्या जंगली हत्तीने काल मध्यरात्री चंदगड तालुक्यातील बुक्कीहळ खुर्द व बुद्रुक गावांच्या शिवारात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गेले अनेक महिने या परिसरात वावरणारा शांत स्वभावाचा हा हत्ती अचानक आक्रमक झाल्याने मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने तालुक्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

हत्तीने मोडतोड केलेली बैलगाडी.

       गेल्या तीन-चार दिवसात कोवाड- बेळगाव मार्गावरील अतिवाड फाटा येथील रसवंतीगृह च्या शेडसह तेथे ग्राहकांसाठी ठेवण्यात आलेल्या टेबल खुर्च्यांची मोडतोड केली होती. तर माणगाव (ता. चंदगड) येथील एका कार मालकाने याच रस्त्यालगत थांबवलेल्या स्विफ्ट कारचा इकडे तिकडे फेकून अक्षरशः खुळखुळा करून टाकला होता. परिसरातील बेकिनकेरे, अतिवाड, देवरवाडी, उचगाव, कालकुंद्री, कागणी आदी  गावातील गल्ल्यांतून रात्री व दिवसाही बिनधास्त फिरत जाणारा चाळोबा गणेश हत्ती अचानक का खवळला? या विचाराने वनविभागही चक्रावून गेला आहे. 

       दि. २१ मे २०२५ रोजी मध्यरात्री या हत्तीने बुक्किहाळ खुर्द व बुद्रुक गावांच्या शिवारात धुमाकूळ घातला. बारदेसकर व पलाट नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतात शेतकऱ्यांनी लावलेल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर ट्रॉली, केळीच्या बागा व ऊस पिक यावर हत्तीने राग काढला. विशेष म्हणजे नजीकच्या वैजनाथ डोंगराकडून वारंवार येणारे गव्यांचे कळप ऊस व अन्य पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टर ट्रॉल्या, बैलगाड्या केळी व ऊस पिकालगत उभे केल्या असून रात्री रखवाली साठी जाणारे शेतकरी तरुण या ट्रॉलीमध्ये झोपत असतात. तथापि गेले दोनतीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे ते रखवाली साठी शेतात गेले नसल्याने  मोठा अनर्थ टळला. 

     हत्तीने केलेल्या नुकसानीत बुक्किहाळ खुर्द येथील अर्जुन विठोबा बिर्जे, परशराम मंगाना बिर्जे, गुंडू मंगाना बिर्जे, शिवाजी तुकाराम बिर्जे आदी शेतकऱ्यांच्या ऊस व केळी पिक तसेच ट्रॅक्टर ट्रॉली व बैलगाडी  यांचा समावेश आहे.  वन्य प्राण्यांचा उपद्रव थोपवण्याबरोबरच नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कळपातील वर्चस्वासाठी दोन मोठ्या हत्तींची टक्कर 

       गेल्या काही वर्षांत सीमावर्ती चंदगड, आजरा, गडहिंग्लज, सावंतवाडी, दोडामार्ग, बेळगाव, हुक्केरी या तालुक्यांमध्ये ठराविक हत्ती वावरत आहेत. या हत्तींना त्यांचा स्वभाव व दिसण्यानुसार विविध नावे दिली गेली. सध्या सावंतवाडी येथे व दोन वर्षांपूर्वी चंदगड तालुक्यात वनपाल व प्रभारी वनक्षेत्रपाल म्हणून कार्यरत असलेले जे स्वतः एक कवी साहित्यिक असून त्यांचा एक कवितासंग्रह प्रसिद्ध आहे अशा दत्ता पाटील यांनी वेगवेगळी नावे दिली.  गावात हत्ती आल्यास तो आक्रमक आहे की शांत? या स्वभाव गुणधर्मानुसार लोकांनी सावधगिरी बाळगावी हा यामागे उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आजरा तालुक्यातील चाळोबा डोंगरात प्रथम दिसला व हत्ती म्हणजे गणेश चे प्रतीक म्हणून या हत्तीला चाळोबा गणेश, परिसरात आढळणारा सर्वात मोठा हत्ती म्हणून त्याला अण्णा, सुंदर दिसणारी हत्तीण म्हणून मोहिनी, ओंकार, सोंगट्या आदी नावे दिलेली आहेत. यातील काही हत्ती शांत तर काही आक्रमक स्वभावाचे आहेत. भागातील गावागावातून फिरणारा चाळोबा गणेश शांत स्वभावाचा म्हणून ओळख होती तथापि कळपातील वर्चस्वासाठी अण्णा आणि चाळोबा गणेश यांची तिलारीनगर परिसरात भीषण टक्कर झाल्याचे समजते. यामुळेच एरवी शांत असलेला चाळोबा गणेश हत्ती आक्रमक झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याच्या आक्रमक पणामुळे परिसरातील लोकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment