दौलत - अथर्व प्रशासनातील वाद आमदार शिवाजीराव पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीने मिटला, कारखाना सुरु होण्याचा मार्ग मोगळा - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2025

दौलत - अथर्व प्रशासनातील वाद आमदार शिवाजीराव पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीने मिटला, कारखाना सुरु होण्याचा मार्ग मोगळा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आणि चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या प्रभावी पुढाकाराने दौलत साखर कारखाना चालक व कामगारांमधील वाद अखेर मिटला असून, आजपासून पुन्हा कारखान्याचे कामकाज सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    काल आमदार शिवाजी पाटील यांनी या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात सकारात्मक हस्तक्षेप करून तोडगा काढण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

       यानंतर आज आमदार पाटील यांच्या निवासस्थानी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना चालक, कामगार नेते आणि शेकडो कामगारांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार शिवाजी पाटील यांनी सांगितले की,“चंदगडचा शेतकरी जगला पाहिजे आणि कामगार टिकला पाहिजे,” या विचारातून त्यांनी दोन्ही बाजूंना एकत्र आणत यशस्वी तोडगा काढला.

   बैठकीत पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले : कामगारांचा वेतनश्रेणी, दिवाळी बोनस, हलता महागाई भत्ता, कामगारांवरील केसेस, बडतर्फी नोटिसा, हंगामी कामगारांचा प्रश्न. या सर्व बाबींवर कायदेशीर करार करण्याचे ठरले.

    बैठकीत मानसिंग खोराटे यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यांची अंमलबजावणीसाठी थोडा वेळ मागितला आहे. कामगार संघटनांनी यास सहमती दर्शवली. या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून चंदगड तालुक्यात पुन्हा उस गाळप हंगामाच्या तयारीला गती मिळाली आहे.

    या प्रसंगी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, चेअरमन मानसिंग खोराटे, तसेच कामगार नेते प्रदीप पवार, अशोक गावडे, शांताराम पाटील, महादेव फाटक, दिपक पाटील, बबनराव देसाई यांसह असंख्य कामगार, शेतकरी व पत्रकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment