चंदगड नगरपंचायत निवडणूक, नगराध्यक्ष पदाचे १६ पैकी ५ तर नगरसेवक पदाचे १२५ पैकी १८ उमेदवारी अर्ज अवैध - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2025

चंदगड नगरपंचायत निवडणूक, नगराध्यक्ष पदाचे १६ पैकी ५ तर नगरसेवक पदाचे १२५ पैकी १८ उमेदवारी अर्ज अवैध

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

       'चंदगड नगरपंचायत निवडणूक २०२५' ची अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या पायरीनंतर आज मंगळवार दि. १८ रोजी अर्जांच्या छाननीची दुसरी पायरी पार पडली. नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेल्या १६ उमेदवारी अर्जांपैकी तब्बल ५ अर्ज अवैध ठरले. तर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या १२५ अर्जांपैकी १८ उमेदवारी अर्ज अवैध ठरले.

   वैध ठरलेल्या १०७ उमेदवारांपैकी २४ जणांनी एकापेक्षा अनेक वेळा अर्ज दाखल केलेले असल्यामुळे प्रत्यक्षात नगरसेवक पदासाठी ८३ उमेदवार मैदानात शिल्लक आहेत. तथापि २१ नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारीची मुदत असल्याने त्यानंतरच प्रत्यक्षात निवडणूक लढवणारे उमेदवार मैदानात राहतील.

   नगराध्यक्ष पदासाठीच्या अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये विजय भरमू कडूकर, सुरेश गोपाळ सातवणेकर, परशराम विठोबा गावडे, सदानंद महादेव बल्लाळ, राजेश शिवाजी पाटील यांचा समावेश आहे.

   दरम्यान नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊन माजी आमदार राजेश पाटील, डॉ. नंदा बाभुळकर व गोपाळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पॅनेलला टक्कर देत आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाने आपले पॅनल काल जाहीर केले आहे. तथापि आमदार शिवाजीराव पाटील यांनी काल भाजपच्या अधिकृत पॅनेलमधील नावांची घोषणा करत असताना राज्य शासनातील शिवसेना शिंदे गटाचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क साधून राष्ट्रवादी प्रणित शाहू विकास आघाडी विरोधात एकच पॅनल करण्यासाठी भाजप व शिवसेनेचे संयुक्त पॅनलसाठी आपण सहकार्य करावे. अशी विनंती आबिटकर यांना करणार असल्याचे काल सांगितल्याने या तिसऱ्या पॅनल बाबत तर्कवितर्क व संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र शिंदे शिवसेना पॅनल मधील प्रमुख उमेदवार बाळासाहेब उर्फ आनंद हळदणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपण तिसऱ्या पॅनलवर ठाम असल्याचे सी. एल. न्यूज शी बोलताना  सांगितले.

No comments:

Post a Comment