
राजगोळी खुर्द, राजगोळी बुद्रुक व कुदनूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे पुस्तक वाटप करताना पैलवान विष्णू जोशी सर यांच्या सोबत मान्यवर, मुख्याध्यापक व शिक्षक
चंदगड : सी एल वृत्तसेवा
शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर, कोल्हापूर (मुळगाव किणी, ता. चंदगड) यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयांना सुमारे २ हजार ग्रंथ पुस्तकांचे वाटप नुकतेच पूर्ण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ चे निवृत्त अधिकारी व महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे पदाधिकारी व मार्गदर्शक तसेच दूरदर्शन मालिका व चित्रपट अभिनेते असलेले महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांचा ७० वा वाढदिवस १७ ऑगस्ट २०२५ रोजी कोल्हापूर येथे खा. छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक वसंतराव मोरे, चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला होता. या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ हार, शाल, भेटवस्तू यांना फाटा देत वाढदिवस कमिटीने जोशीलकर 'तात्या' यांची 'ग्रंथ तुला' करण्याचा संकल्प करून शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सर्वांना ग्रंथ पुस्तके घेऊन येण्यास कळवले होते. या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शेकडो पुस्तके यानिमित्त निमित्ताने जमा झाली होती. या पुस्तकांचा उपयोग जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांना व्हावा या उद्देशाने त्यांनी ही पुस्तके सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये पोहोचवली. मागील महिन्यात पहिल्या टप्प्यात पुस्तक वाटप केल्यानंतर उर्वरित पुस्तकांचा वाटप शुभारंभ चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील राजगोळी खुर्द, राजगोळी बुद्रुक व कुदनूर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून केला.
राजगोळी खुर्द येथे मुख्याध्यापक बी. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रंथ वितरण कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उमेश इनामदार यांनी केले. दत्त हायस्कूल राजगोळी बुद्रुक येथे मुख्याध्यापक आनंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर श्री सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कुदनूर येथे प्राचार्य एस जी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडले.
यावेळी पैलवान जोशीलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या कुस्ती कारकिर्दीतील अनुभव सांगताना विद्यार्थ्यांनी खेळाबरोबरच वाचनाची आवड जोपासावी, थोर व्यक्तींची चरित्र व आत्मचरित्रे वाचून वाचल्यास त्यातून आपले व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते असे सांगितले. यावेळी निवृत्त केंद्र मुख्याध्यापक व चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, बाळकृष्ण गणाचारी आदींची समायोजित भाषणे झाली. यावेळी महाराष्ट्र विज वितरण कामगार महासंघाचे पुणे प्रादेशिक अध्यक्ष तानाजी हातकर, विभागीय अध्यक्ष विनय कोटी, रत्नागिरी येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता ऋषिकेश पाटील, माजी प्राचार्य पी बी पाटील, उत्तम कोकितकर, पत्रकार संदीप तारीहाळकर, लाईनमन युवराज पाटील, अजित परीट आदींसह सर्व शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची उपस्थिती होती.


No comments:
Post a Comment