संपत पाटील, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
पुण्यात स्थायिक झालेल्या चंदगड तालुक्यातील नागरिकांना एकत्र आणणारा नागरिक रहिवासी संघ, चंदगड तालुका (पुणे) यांचा वार्षिक स्नेहमेळावा मंगळवार दि. २३ डिसेंबर रोजी म्हातोबा बँक्वेट हॉल, म्हातोबा मंदिर, कोथरूड गावठाण, पुणे येथे अत्यंत उत्साहात व आपुलकीच्या वातावरणात पार पडला. सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक एकोपा आणि मातृभूमीशी नाते जपणारा हा मेळावा विविध उपक्रमांनी समृद्ध झाला.
संघाचे उपाध्यक्ष संतोष गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत संघाच्या कार्याचा आढावा घेतला. स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ‘हॉटेल मराठी बाणा’चे प्रमुख मारुती शिट्याळकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवसाय आयकॉन व प्रेरक वक्ते श्रीकृष्ण जोशी आणि समाजसेविका आरती जाधव उपस्थित होत्या. कार्यक्रमात बोलताना प्रेरक वक्ते श्रीकृष्ण जोशी यांनी ``उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक असलेली मानसिकता, येणाऱ्या अडचणी आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी पाळावयाची मूलतत्त्वे यावर मार्गदर्शन केले.`` समाजसेविका आरती जाधव यांनी महिलांना सबलीकरण, बचत गट, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, “चंदगड तालुक्यातील मोठ्या संख्येने लोक पुण्यात स्थायिक आहेत. या संघाला मी माझे कुटुंब मानतो. येणाऱ्या काळात संघाच्या प्रत्येक कार्यासाठी मी प्रयत्नशील राहीन आणि चंदगड भवनसाठी शक्य ती मदत करेन.” तर चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थितांशी संवाद साधत संघाला शुभेच्छा दिल्या व लवकरच चंदगड भवनच्या पायाभरणीचे आश्वासन दिले.
या स्नेहमेळाव्यात संघाची वार्षिक दिनदर्शिका प्रकाशन, सभासद मेळावा तसेच महिलांसाठी खास “खेळ – पैठणीचा” ही स्पर्धा होम मिनिस्टर फेम अभिनेत्री मेघनाताई झुझम यांच्या उपस्थितीत पार पडली. या स्पर्धेतील विजेत्या सुरेखा हरेर, मंदा गोलमडे, वंदना गावडे, नीता नाईक, सानिका नाईक, संजना पाटील, पूजा नाईक, सुजाता मिसाळे, रूपाली गोडसे, मनीषा शिट्याळकर या स्पर्धकांना वैष्णवी ज्वेलर्स व संघाच्या वतीने पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा छल्ला, कुकर, मिक्सर यांसह एकूण १२ आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
समारोपप्रसंगी संघाचे कार्याध्यक्ष सुरेश नेसरकर यांनी मनोगतात म्हणाले कि, आपण एक परिवार व कुटुंब आहोत,दरवर्षी आपण विविध उपक्रम राबवितो. त्यामार्फत आपण चंदगडकरांना एकत्र आणतो, तसेच तालुक्यातील गरजूना सहकार्य करतो,येणाऱ्या काळातही असंच संघामार्फत आमचं कार्य नियोजितपणे चालू राहील. चंदगड भवन ही संकल्पना लवकरच सत्यात उतरवू यासाठी मोठ्या संख्येने चंदगडकरांनी सभासद होऊन संघाला पाठबळ द्या.``
या कार्यक्रमानंतर सर्व सभासद व कुटुंबीयांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुण्यातील स्थायिक चंदगडवांशियांची उपस्थिती लक्षणीय होती. एकूणच संघाच्या कार्यकारिणी व सदस्यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला. यामध्ये लक्ष्मण सावंत, विजय गावडे, राजू गोरल, अनिलभाऊ दळवी, सचिन मेंगाणे, विनायक अमृसकर, मारुती पाटील, अजय देवण, गजानन गावडे, गोविंद नाडगोंडा, गोविंद नाईक, गोपाळ तुप्पट, विनोद कडते, सुभाष आपटेकर, तुकाराम शेडगे यासह आदी मंडळींचा सहभाग होता.
मातीशी नाते जपणारा, माणसांना जोडणारा आणि चंदगडच्या अस्मितेचा अभिमान बाळगणारा हा स्नेहमेळावा पुण्यातील चंदगडकरांसाठी खऱ्या अर्थाने एक पर्वणी ठरला.


.jpeg)
No comments:
Post a Comment