
विज्ञान प्रदर्शन प्रसंगी बोलताना प्रा. एन. एस. पाटील
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनि कॉलेज, चंदगड यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य विज्ञान प्रदर्शन उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. शाळेच्या प्रांगणात विज्ञानाची सृजनशीलता, प्रयोगशीलता आणि विद्यार्थ्यांच्या नव्या कल्पनांची रंगीत दुनिया खुलून दिसत होती.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अॅड.प्रा. एन. एस. पाटील यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध मॉडेल्सची पाहणी करताना ते म्हणाले, “विज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन कायम ठेवून प्रयोगशील राहणे ही काळाची गरज बनली आहे.” त्यांच्या या विचारांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या मनात विज्ञानाविषयी नवीन उत्साह जागवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. व्ही. बी. गावडे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या प्रा. आर. पी. पाटील यांनी विज्ञानाच्या उपयुक्ततेवर भाष्य करताना सांगितले की, “अंधश्रद्धेवर मात करण्याचे सर्वात प्रभावी साधन म्हणजे विज्ञान. परंतु विज्ञानाबरोबरच संस्कार जपणे हेही तितकेच गरजेचे आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष एल. डी. कांबळे यांनी पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा समोर ठेवत आपल्या भाषणात नमूद केले की,“मानव जातीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास वाढत चालला आहे. पर्यावरण वाचवणे ही आज मानवजातीपुढील सर्वात मोठी गरज असून त्यासाठी नवे उपाय शोधणे अत्यावश्यक आहे.”
या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी एकूण ३५ आधुनिक उपकरणे व मॉडेल्स सादर केली. ऊर्जा संवर्धन, पाणी शुद्धीकरण, रोबोटिक्स, पर्यावरण संवर्धन, ध्वनी आणि प्रकाश यांच्या विविध प्रयोगांचे मॉडेल्स विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे कौतुक सर्वच मान्यवरांनी केले.
या उपक्रमात ग्रंथपाल शरद हदगल यांनी विज्ञान विषयक पुस्तकांचे स्वतंत्र प्रदर्शन भरविले होते. विज्ञान, अवकाश, शोधकर्ते आणि तंत्रज्ञान या विविध क्षेत्रांवरील पुस्तकांना विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दाखवला .
खजिनदार अनंत सुतार, संचालक रामाणा पाटील, प्रा. एस. एम. निळकंठ, प्रा. डी. व्ही. शिंदे, प्रा. व्ही. एम. बुरुड, पी. आर. गोरल, एस. एस. मुसळे, एस. व्ही. वरपे, वर्षा पाटील, एस. व्ही. शेख आदी मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. जी. साबळे यांनी केले. उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी आभार मानले.
.jpeg)
No comments:
Post a Comment