चंदगड नगरपंचायतीमध्ये सत्ताधाऱ्यांचा पराभव करत भाजपने सत्तांतर घडवून आणले. आज लागलेल्या निकालामध्ये नगराध्यक्ष म्हणून सुनिल काणेकर हे निवडून आले. नगराध्यक्षपदी भाजप शिवसेना युतीचे सुनिल काणेकर यांनी राजश्री शाहू आघाडीचे दयानंद काणेकर व बसपाचे श्रीकांत कांबळे यांचा पराभव करत विजय मिळाविला. तर भाजपने नगरसेवक पदाच्या ८ तर राजश्री शाहू आघाडीने ८ जागा मिळविल्या. तसेच वार्ड क्र. १५ मध्ये एक जागेवर अजिंक्य अरुण पिळणकर हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीमध्ये एकमेव अपक्ष उमेदवार अजिंक्य पिळणकर यांनी भाजपला पाठींबा दिला आहे.
राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व काँग्रेस या पक्षांसह मित्रपक्षाचे उमेदवार म्हणून दयानंद काणेकर यांनी निवडणुक लढवली होती. दयानंद काणेकर यांच्या राजर्षी शाहू आघाडीतील सर्व उमेदवारांसाठी माजी आमदार राजेश पाटील, गोपाळराव पाटील, डॉ. नंदिनी बाभूळकर, संभाजीराव देसाई, एम. जे. पाटील यांनी ताकद पणाला लावली आहे. तर भाजप समर्थक विद्यमान आमदार शिवाजी पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाची युती करुन निवडणुक लढवली होती.
आज सकाळी नऊ वाजता मतमोजणी प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात प्रवेश दिला गेला. यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना सुचना देण्यात आल्या. सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात झाली. दोन फेऱ्यामध्ये झालेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीमध्ये १ ते ९ वार्डाची मतमोजणी ९ टेबलवर झाली. पहिल्या फेरीमध्ये राजश्री शाहू आघाडीचे ६ तर भाजप शिवसेना युतीचे ३ नगरसेवक निवडून आले. या पहिल्या फेरीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दयानंद काणेकर यांच्यापेक्षा सुनिल काणेकर तीनशेहून अधिक मतांनी आघाडीवर होते. सकाळी साडेनऊ वाजता पहिल्या फेरीचा निकाल हाती आला. पहिल्या फेरीमध्ये शाहू आघाडीचे ६ उमेदवार निवडून आल्याने शाहू आघाडीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. तसेच नारळाचे झेंडे फडकवत घोषणा दिल्या.
दुसऱ्या फेरीमध्ये १० ते १७ वार्डांची मतमोजणी झाली. यामध्ये राजश्री शाहू आघाडीचे २, भाजप शिवसेना युतीचे ५ तर वार्ड क्रमांक १५ मधून अंजिंक्य अरुण पिळणकर हे एकमेव अपक्ष उमेदवार निवडून आले. पहिल्या फेरीपासून भाजपचे उमेदवार सुनिल काणेकर हे आघाडीवर होते. वार्ड क्र. ५ मध्ये १३९ व वार्ड क्र. ६ मध्ये ३७ मतांची आघाडी वगळता दयानंद काणेकर हे इतर वार्डमध्ये पिछाडीवर राहिले, त्यामुळे त्यांचा पराभव झाला.
सकाळी ११ वाजता निकालाची औपचारीकता संपल्यानंतर भाजप शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मतमोजणी केंद्राच्या दोन्ही बाजूंनी बॅरीकेट्स लावून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जस-जसा निकाल हाती येईल व मतमोजणी प्रतिनिधी बाहेर येतील, तसतसे कार्यकर्ते घोषणा देत जल्लोष करत होते. निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आमदार शिवाजीराव पाटील यांनी मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना मिठी मारत जल्लोष करत भाजपचे झेंडे उंचावून आनंद व्यक्त केला. त्यानंतर नगराध्यक्ष सुनिल काणेकर हे मतमोजणी स्थळी आल्याने त्यांना उचलून खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण फटाक्यांची आतीषबाजी यामुळे सर्वत्र परिसर गुलालाने माखला होता. निकालानंतर निवडणुक निर्णय अधिकारी तहसिलदार राजेश चव्हाण यांनी सर्व उमेदवारांना प्रमाणपत्र दिले.



No comments:
Post a Comment