चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
२० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारसंघातील सर्व नागरिकांनी आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे यादीत असल्याची खात्री करावी. ज्यांचे नाव मतदार यादीत नोंद नसेल किंवा चुकून वगळणी झाली असेल त्यांना शनिवार दि. १९ ऑक्टोबर २०२४ अखेर नाव नोंदणी करण्याची आणखी संधी निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. अशी माहिती राजेश चव्हाण सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार चंदगड यांनी दिली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक प्रसंगी गावोगावी अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या. यावेळी यावेळी यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांनी संताप व्यक्त करत मतदान केंद्रांवर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. अशी वेळ पुन्हा विधानसभा निवडणूकी वेळी येऊ नये यासाठी निवडणूक विभागाने दक्षता घेतली आहे. तरीही सर्व मतदारांनी आपले नाव यादीत असल्याची तात्काळ खात्री करावी. ही मतदार यादी घरबसल्याही तपासता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https:///voters.ecigov.in/ या संकेतस्थळावर किंवा voter helpline ॲपवर नाव शोधता येणार आहे. यादीत नाव नसेल किंवा फोटो व मजकूर चुकीचा असेल तर ही गोष्ट बीएलओ यांच्या निदर्शनास आणून द्यावी. यादीत नाव समाविष्ट करणे किंवा दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. अशा दि. १९ पर्यंत प्राप्त झालेल्य अर्जांची तात्काळ छाननी करून अंतिम पुरवणी यादी निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध होणार आहे. मतदार यादी अद्यावत करणे कामी मतदार नोंदणी अधिकारी तथा गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसिलदार सुरेश दळवी, महसूल सहाय्यक अमर साळोखे, निवडणूक संगणक तज्ञ नेहाल मुल्ला आदी परिश्रम घेत आहेत.
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न...
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यास अनुसरून चंदगड विधानसभा मतदारसंघात पथनाट्य, पोवाडे, ध्वनिक्षेपकावरून मतदानाचे आवाहन, आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना, नोडल अधिकाऱ्यांमार्फत ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे असे विविध उपक्रम. त्याचबरोबर मतदान करण्यासाठी केंद्रावर येताना लागणारे मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट असे छायाचित्र असलेले ओळखपत्र असा कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केले आहे. अशी माहिती तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली.
No comments:
Post a Comment