न्हावेली गावच्या स्मशानभूमी जागेचा प्रश्न मिटला, स्मशान शेड उभारणीचा मार्ग मोकळा - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2025

न्हावेली गावच्या स्मशानभूमी जागेचा प्रश्न मिटला, स्मशान शेड उभारणीचा मार्ग मोकळा

 

न्हावेली (ता. चंदगड) येथे स्मशान शेड व शिवलिंग साठी दिलेल्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी उपस्थित नायब तहसीलदार हेमंत कामत, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे व ग्रामस्थ.

चंदगड : सी एल वृत्तसेवा
   चंदगड तालुक्यातील न्हावेली गावच्या स्मशानभूमीचा जागेचा प्रश्न गेली अनेक वर्ष रेंगाळला होता. गावातील फडणीस कुटुंबीयांनी या कामासाठी आपल्या मालकीची पाच गुंठे जागा बक्षीसपत्र केली होती. तथापि नकाशात ही पाच गुंठे जागा नेमकी कोणती? याबाबत संभ्रमावस्था होती. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी उमगाव ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांनी पुढाकार घेऊन तहसीलदार कार्यालयाशी संपर्क केला.  त्यांना तहसीलदार राजेश चव्हाण, नायब तहसीलदार हेमंत कामत, चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांचे सहकार्य लाभले. या प्रशासन अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करत या प्रश्नाची सोडवणूक केली.
     या स्मशानभूमीला लागूनच पुरातन शिवलिंग आहे. पाच गुंठे पैकी शिवलिंग (शिवमंदिरासाठी) व स्मशानभूमीसाठी किती क्षेत्र द्यायचे, याबाबत उमगाव ग्रामपंचायत कमिटी, लक्ष्मण गावडे, फडणीस कुटुंबीय व नावेली ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत नायब तहसीलदार हेमंत कामत व पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी यशस्वी तोडगा काढत दोन गुंठे जागा स्मशानभूमीसाठी व उर्वरित तीन गुंठे शिवमंदिरसाठी देण्याचे निश्चित केले. सर्व ग्रामस्थांनी हे मान्य केल्याने न्हावेली स्मशानभूमी तील स्मशान शेड उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मशान शेड साठीचा निधी या आधीच उपलब्ध झाला असला तरी देणगी दिलेल्या जमिनीचा निश्चित नकाशा उपलब्ध नसल्याने हे काम रेंगाळले होते. आत्ता हे काम मार्गी लागणार असल्याने न्हावेली ग्रामस्थांची गेल्या पन्नास वर्षांपासून मृत्यूनंतर अंत्यविधी प्रसंगी येणाऱ्या विविध अडचणी पासून सुटका मिळणार आहे. 
  न्हावेली गावात काल झालेल्या बैठक प्रसंगी लक्ष्मण गावडे, नायब तहसीलदार हेमंत कामत, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस पाटील मनोज गावडे, ज्ञानेश्वर पाटील, कृष्णा सावंत, लक्ष्मण पाटील, अशोक पेडणेकर, श्याम फडणीस, पांडुरंग गावडे, गुरु फडणीस व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment