देशाच्या स्वास्थ्यासाठी महिलांचे आरोग्य महत्त्वाचे - डॉ. एस. डी. गावडे, माडखोलकर महाविद्यालयात `महिलांचे आरोग्यविषयक शिबिर आणि अभियान` कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2025

देशाच्या स्वास्थ्यासाठी महिलांचे आरोग्य महत्त्वाचे - डॉ. एस. डी. गावडे, माडखोलकर महाविद्यालयात `महिलांचे आरोग्यविषयक शिबिर आणि अभियान` कार्यक्रम

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        स्वस्त समाज देशाचे भवितव्य घडवू शकतो आणि स्वस्त समाजाच्या निर्मितीमध्ये महिलांच्या आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये आयोजित `महिलांचे आरोग्यविषयक शिबिर आणि अभियान` या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी कल्याण समितीचे समन्वयक व समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. डी. गावडे यांनी केले. 

    डॉ. गावडे पुढे म्हणाले, ``आधुनिक भारताचे स्वरूप खूप वेगाने बदलत आहे. ज्यामुळे भारतीयांच्या आयुष्यातील विविध क्षेत्रांमध्ये ही मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांच्या आयुष्यामध्ये आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. आवश्यक असणारे उष्मांक, कार्बोदके आणि प्रथिने यांची तपासणी वेळोवेळी होऊन त्यांच्या आयुष्यामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करावी. या उद्देशाने हे अभियान शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये राबविले जात आहे.`` 

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. महाविद्यालयातील मुलींनी त्यांच्या आरोग्य विषयी सतर्क असायलाच हवे कारण त्या यशस्वी भारताच्या सुदृढ समाजाच्या शिल्पकार आहेत असे ते यावेळी म्हणाले. महाविद्यालयातील सर्व मुलींनी त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या या मोफत आरोग्य शिबिराचा त्यांनी लाभ घ्यावा असेही आव्हान महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनीना त्यांनी केले. 

    या कार्यक्रमाचे आभार डॉ. एन. के. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. एस. एस. सावंत, प्रा. सचिन गावडे व डॉ. आर. ए. कमलाकर उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र, चंदगडचे डॉ. कुपेकर आणि डॉ. हासुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका अश्विनी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी महिलांची आरोग्य तपासणी केली.

No comments:

Post a Comment