शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध: आमदार प्रा.आसगावकर हलकर्णी महाविद्यालयास सदिच्छा भेट - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2025

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध: आमदार प्रा.आसगावकर हलकर्णी महाविद्यालयास सदिच्छा भेट

 


 चंदगड /प्रतिनिधी
      आजच्या शिक्षण व्यवस्थेला सामोरे जाताना अनंत अडचणी आहेत. मात्र या सगळ्यात आपण नवीन शैक्षणिक धोरण समजून घेणे महत्त्वाचे आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. कोणत्याही पातळीवर शिक्षकांचे प्रश्न सोडवणे आणि शिक्षकांना न्याय देणे यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे.' असे प्रतिपादन पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी हलकर्णी ता चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे सदिच्छा भेट प्रसंगी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे गोपाळराव पाटील होते. 
प्रारंभी  आम.प्रा. जयंत आसगावकर यांचा सत्कार संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. माजी प्राचार्य प्रा पी ए पाटील यांनी स्वागत केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर बी गावडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर खेडूत शिक्षण मंडळचे आर पी पाटील, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे राजाभाऊ पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, माजी प्राचार्य. गुरब, पी. एस. पाटील, के के पाटील, उदय पाटील सुभाष कलतगे, श्रीधर गोंधळी, संस्थेचे हितचिंतक आदी मान्यवर उपस्थित होते. 
अध्यक्षीय भाषणात बोलताना गोपाळराव पाटील म्हणाले, ' आपले महाविद्यालय हे ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय आहे. वेतनेत्तर अनुदान नसल्याने बऱ्याच सोयी सुविधांपासून आम्ही वंचित आहोत. या सर्व प्रश्नांकडे आमदार साहेबांनी लक्ष द्यावे. जेणेकरून सोयी सुविधा उपलब्ध करून देता येतील.'
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग,  शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदिप बोभाटे यांनी केले तर आभार डॉ. राजेश घोरपडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment