दरोड्याचा बनाव करून पत्नीचा खून करणाऱ्या पतीच्या पोलीसांनी २४ तासांत मुसक्या आवळल्या...! सोने गहाण ठेवण्यास विरोध दर्शवल्याने कृत्य, आजरा तालुक्यातील घटना - चंदगड लाईव्ह न्युज

19 May 2025

दरोड्याचा बनाव करून पत्नीचा खून करणाऱ्या पतीच्या पोलीसांनी २४ तासांत मुसक्या आवळल्या...! सोने गहाण ठेवण्यास विरोध दर्शवल्याने कृत्य, आजरा तालुक्यातील घटना

दरोड्याचा बनाव करून पत्नीचा खून करणारा नराधम पती सुशांत गुरव यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या यावेळी आरोपी सोबत वरिष्ठ अधिकारी तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी.
आजरा : गोपाळ गडकरी/ सी एल वृत्तसेवा 
      आजरा तालुक्यातील मडिलगे येथे रविवारी घडलेल्या दरोडा प्रकरणातील तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या २४ तासात सत्य उघडकीस आणत दरोड्याचा बनाव करून स्वतःच्या पत्नीला संपवणाऱ्या खुनी पतीला गजाआड केले. कर्जबाजारीपणाला कंटाळून व आपल्याला झालेल्या सोरायसिस या आजारावर उपचाराकरिता पत्नी सोने गहाण ठेवण्यासाठी देत नाही, या रागातून पती सुशांत सुरेश गुरव यानेच पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने आजारात तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 
   हा दरोडा नव्हे तर दरोड्याचा बनाव असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सुशांत गुरव याला पोलिसांनी अटक करत या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.
  सुशांत गुरव याने अनेक लोकांकडून व बँकेकडून कर्जे घेतलेली आहेत. तो कर्जबाजारी असल्याने ते परत करण्यासाठी सुशांत हा त्याची पत्नी पुजा गुरव हिच्याकडे सोन्याचे दागिणे गहाण ठेवून पैसे काढून लोकांची देणी व बँकेचे कर्ज भागवूया तसेच आपल्याला असलेल्या सोरायसीस या आजारावर औषधोपचार करुया असे म्हणत होता. दिनांक १८ मे २०२५ रोजी मध्यरात्री २.४५ च्या  सुमारास सुशांत व पत्नी पुजा या दोघांमध्ये वादावादी झाली. पत्नी पुजा हिने यापूर्वी देखील तुमच्या आजोबांच्या आजारपणावेळीपण सोने गहाण ठेवले होते. आता मी सोने देणार नाही. तुम्ही काय करायचे ते करा! असे म्हटल्याने सुशांत याने रागाच्या भरात घरातच असलेल्या दगडाने व शेतात काम करण्याच्या छोट्या फावड्याने  पुजा च्या डोक्यात घाव घालून ठार केले. त्यानंतर दरोड्याचा बनाव रचल्याची कबुली पोलिसांना दिली. सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्वक तपास करुन फिर्यादी हाच आरोपी असल्याचे निष्पन्न करुन गुन्हा २४ तासांच्या आत पोलिसांनी उघडकीस आणला व सुशांत कडून दागिने हस्तगत केले.
  तपास करीत असताना फिर्यादी सुशांत याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती घेत असताना सदरची घटना ही खुन व दरोडा पडला आहे असे भासवण्याचा प्रयत्न करीत होता. फिर्यादी याचा बनाव हा तपास पथकाच्या निदर्शनास आल्याने तपास पथकाने फिर्यादी यांच्याकडून गुन्ह्याचे प्रात्यक्षिक करुन घेत असताना त्याने दिलेला फिर्यादी जबाब व प्रात्यक्षिक यामध्ये संदिग्धता असल्याचे आढळून आले. त्यामुळे फिर्यादी याच्यावर संशय बळावल्याने घटनास्थळावरील परिस्थिती, भौतीक पुरावे, गोपनीय माहिती तसेच फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडे अत्यंत कौशल्यपूर्वक तपास करीत असताना सदरचा गुन्हा हा फिर्यादी सुशांत गुरव यानेच केल्याचे निष्पन्न झाले व पोलिसांनी त्याने पत्नीचा खून पचवण्याचा केलेला डाव उधळून लावला. 
  सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक  निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली एल.सी.बी. चे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, आजरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक मोरे, गळवे, पोलीस अंमलदार समिर कांबळे, प्रकाश पाटील, सतिश जंगम, अमित सर्जे, दिपक घोरपडे, कृष्णात पिंगळे, राजु कांबळे, विशाल चौगले, संदिप बेंद्रे, विजय इंगळे, सचिन जाधव, सोमराज पाटील, रोहित मर्दान, राजेश राठोड, सुहास कांबळे, सुशिल पाटील, हंबिरराव अतिग्रे, अनिल जाधव व स्टाफ, पोउनि. संजय पाटील, पोउनि. युवराज धोंडे, कविता कदम, संदिप म्हसवेकर, साजिद शिकलगार, दयानंद बेनके, पांडुरंग येलकर, रेश्मा नाईक, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कांबळे, नितीन पाटील, अमर उबाळे, विकास कांबळे, वैभव गवळी, सुर्यकांत सुतार, संजय नवलगुंदे, महांतेश पाटील, दत्तात्रय शिंदे, प्रशांत सुतार, रामदास वाघ, प्रकाश पुजारी, विशाल आंबोळे, दिपक किल्लेदार, सुशांत सिंघन यांच्या पथकाने अथक परिश्रम घेतले.

फोटो 
दरोड्याचा बनाव करून पत्नीचा खून करणारा नराधम पती सुशांत गुरव यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या  यावेळी आरोपी सोबत वरिष्ठ अधिकारी तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी.

No comments:

Post a Comment