बेळगाव-वेंगुर्ला रस्ता रुंदीकरणासाठी शिवसेनेचा रास्ता रोको, पाटणे फाटा परिसरात वाहनांच्या रांगा, पुन्हा उग्र आंदोलनाचा जिल्हाप्रमुख प्रा. शिंत्रे यांचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

19 May 2025

बेळगाव-वेंगुर्ला रस्ता रुंदीकरणासाठी शिवसेनेचा रास्ता रोको, पाटणे फाटा परिसरात वाहनांच्या रांगा, पुन्हा उग्र आंदोलनाचा जिल्हाप्रमुख प्रा. शिंत्रे यांचा इशारा

बेळगाव- वेंगुर्ला महामार्ग रुंदीकरण प्रश्नी रास्ता रोको वेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन स्वीकारताना बांधकाम विभागाचे अभियंता इफ्तिकार मुल्ला

 चंदगड : सी एल वृत्तसेवा 
    बेळगाव-वेंगुर्ले रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथे जिल्हाप्रमुख सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसैनिकांसह तालुक्यातील वाहनधारक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.



    केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी वेगवेगळ्या शिष्टमंडळांना हा राज्यमार्ग सहा पदरी करणार अशी दोन वेळा आश्वासने देऊनही सद्यस्थितीत कोणत्या हालचाली दृष्टिपथात नाहीत.  गेल्या पन्नास वर्षात वाहनांची संख्या ५० पटींनी वाढली असताना रस्ता मात्र पन्नास वर्षांपूर्वी होतात तसाच आहे. यामुळे या रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरू झालेली आहे. दरवर्षी कित्येक लोक अपघातात मृत्यू पडतात. शेकडे जण जायबंदी होतात. वाहनांचे कोट्यावधींचे नुकसान होते. तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी ढिम्मच आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाची रस्त्याबाबत असलेली उदासीनता याविरोधात शिवसैनिकांनी रास्ता रोको च्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेतला.
     यावेळी बोलताना प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, “वर्षभरात रस्त्याचे रुंदीकरण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना सैल सोडणार नाही. या रस्त्याच्या बाबतीत प्रशासन एवढं उदास का? या रस्त्यावर झालेल्या अपघातांना शासनाला जबाबदार धरले पाहिजे.  यापुढे असेच अपघात झाल्यास शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करील असा इशारा त्यांनी दिला. 
    यावेळी चंदगड विधानसभा प्रमुख राजू रेडेकर, ॲड  संतोष मळविकर, विष्णू गावडे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने यांनी भाषणे झाली. आंदोलनामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली होती. शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता इफ्तिकार मुल्ला यांनी येऊन निवेदन स्वीकारल्यानंतर रास्ता रोको आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
   आंदोलन यशस्वी करण्यासाठी अवधूत पाटील, किरण नागुर्डेकर, उदय मंडलिक, महेश पाटील, भरमु बिर्जे, कार्तिक सुतार, दयानंद रेडेकर, अशोक पाटील, अनिल फडके, अनिल मोहनगेकर, अवधूत भुजभळ, ज्ञानेश्वर माने, तानाजी पाटील, मनोज रावराणे, कल्लाप्पा सुळेभावकर, प्रवीण कोळसेकर,  शिवानंद अंगडी, बाबू चौगले, श्रीधर भाटे, कल्पेश पाटील, तुकाराम पाटील यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

   

No comments:

Post a Comment