२५ वर्षानंतर पुन्हा पाखरांची शाळा, इयत्ता दहावी २००० च्या वर्गमित्र मैत्रिणींचा स्नेह मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

22 May 2025

२५ वर्षानंतर पुन्हा पाखरांची शाळा, इयत्ता दहावी २००० च्या वर्गमित्र मैत्रिणींचा स्नेह मेळावा

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

      वर्ग तोच होता, बेंच तेच होते सर व मॅडम ही तेच होते फरक इतकाच होता की हे सर्व २५ वर्षानंतर चाळीशी पार केलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी होते. खेडूत शिक्षण मंडळाच्या दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगडच्या दहावीच्या सन २००० च्या बॅचच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आजी-माजी शिक्षक यांचे स्नेह मेळावा शाळेच्या गोगटे सभागृहात संपन्न झाला. सर्व शिक्षक आणि उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी एक सारखेच फेटे बांधले होते. कार्यक्रमाचे ठिकाण सुंदर अशा सजावटीने आतून बाहेरून सजविले होते. कार्यक्रमाच्या आधी आदरणीय कै. माडखोलकर सर यांच्या समाधीचे पूजन कण्यात आले.


     गुरुवर्यांना फुलांच्या वर्षावात कार्यक्रमाच्या ठिकाणी आणले सर्व गुरुवर्यांचे औक्षण करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने राष्ट्रगीत, प्रार्थना गायन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्वांचे स्वागत कार्यक्रम संयोजक अध्यक्ष रविंद्र नाडगौडा यांनी केले. कार्यक्रमात सर्व गुरुवर्य यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव केला. याप्रसंगी सुवर्णा गुरव, तृप्ती पिळणकर, दिलीप कदम, नंदकुमार रेडेकर, अमित दांडगी यांनी मनोगते व्यक्त केली. गुरुवर्यांच्या वतीने कागनकर, श्री. सोमनाचे, श्री. वाके, श्री. कानूरकर, श्री. कांबळे, संचालक आनंद सुतार, श्री. चांदेकर, प्राचार्य आर. पी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. 

        सौ. प्रेमा पवार यांनी मनोगत व्यक्त करताना  गेट-टुगेदर  धरणावर रिसॉर्टवर करण्यापेक्षा आपल्या शाळेत आणि माणसात करणे खूप अनमोल असते. शिक्षक आणि आई-वडील यांच्या आशीर्वाद पाठीशी असतील तर काहीच कमी पडणार नाही असे मत व्यक्त केले. 

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविंद्र नाडगौडा, सचिव मंगेश वणकुंद्रे, खजिनदार संदीप कोकरेकर, रुक्माना  गावडे, हनुमंत येडवे, उर्मिला नांदवडेकर, सुवर्णा गुरव,  भाग्यश्री कुलकर्णी, सुप्रिया नावलगी, भारती  देसाई, किशोर सातवणेकर, अनिल शेलार, सुनील काजिर्णेकर, दिलीप चौकुळकर आदी माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सूत्रसंचालन नंदकुमार रेडेकर यांनी केले. आरती नांगरे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment