'मतदार राजा जागा हो !' पथनाट्याने चंदगडमध्ये जनजागृती,दि न्यू इंग्लिश स्कूल चा ग्रामीण शैलीतला दमदार संदेश! - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2025

'मतदार राजा जागा हो !' पथनाट्याने चंदगडमध्ये जनजागृती,दि न्यू इंग्लिश स्कूल चा ग्रामीण शैलीतला दमदार संदेश!

चंदगड : सी एल वृतसेवा

       येथील नगरपंचायत आयोजित मतदान जनजागृती अभियानात दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड च्या विद्यार्थ्यांनी प्रभावी, विनोदी आणि ग्रामीण बोलीतील पथनाट्य सादर करून उपस्थित नागरिकांची मने जिंकली. “मतदार राजा जागा हो” या संजय साबळे लिखित पथनाट्यातून लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व, जागरूक नागरिकत्व आणि जबाबदार मतदानाची गरज प्रभावीपणे मांडण्यात आली.

    


 ग्रामीण भाषेची चव, बोलभाषेतील संवाद, ताल धरायला लावणारी गाणी आणि मुलांच्या रंगतदार अभिनयामुळे परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे दणदणीत स्वागत केले.

या पथनाट्यात मनाली कांबळे, समिधा खोचरे, स्वाती पवार, ऋतूजा शिरोडकर, अनन्या चंदनवाले, साक्षी गावडे, संस्कृती कांबळे, लबीबा गोरेखान आणि तुषार यादव या विद्यार्थ्यांनी प्रभावी भूमिका साकारून मतदानाचा संदेश सर्वत्र पोहोचवला.

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या तहसीलदार मा. राजेश चव्हाण, तसेच पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीचे आणि सामाजिक जाणिवेचे विशेष कौतुक केले.

पुढे ते म्हणाले, “नव्या पिढीचा असा सहभाग लोकशाहीला बळ देणारा आहे. विद्यार्थ्यांनी केलेली सादरीकरणे नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरतील.”

शालेय समिती चेअरमन अॅड. एन. एस. पाटील, प्राचार्य आर. पी. पाटील आणि उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी या उपक्रमाचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.

दि न्यू इंग्लिश स्कूलने सामाजिक जाणिवेची भक्कम परंपरा जपत लोकशाही पर्वात दिलेले योगदान जिल्ह्यात अनुकरणीय मानले जात आहे.

No comments:

Post a Comment