चंदगड : सी एल वृत्तसेवा
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन 14 नोव्हेंबर संपूर्ण देशभर बालदिन म्हणून साजरा केला जातो. दक्षिण गोव्यातील कुठ्ठाळी येथील कला शक्ती डान्स इंस्टीट्युटच्या वतीने कुठ्ठाळी व सांकवाळ परिसरातील शंभर पेक्षा अधिक चिमुकले बालकलाकार व महिला कलाकारांच्या विविध गुणदर्शनाने अभूतपूर्व गर्दीत यंदाचा बालदिन साजरा करण्यात आला. कला शक्ती नृत्य संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. सु्प्रिया सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून IZMO Ltd. च्या संस्थापिका पद्मश्री पुरस्कार प्राप्त सौ शशी सोनी होत्या.
स्वागत कोषाध्यक्षा सौ विधीशा पेडणेकर व सपना सावंत यांनी केले. संस्था सचिव सौ किर्ती नाईक यांनी प्रास्ताविक केले. सांकवाळच्या श्री शांतादुर्गा मंदिर परिसरातील सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात चाचा नेहरुंच्या प्रतिमा पूजनाने झाली. कु. सपना सावंत यांनी आपल्या भाषणात पंडित नेहरू यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. यानंतर झालेल्या रंगारंग कार्यक्रमात कला शक्ती डान्स इन्स्टिट्यूट मधील प्रशिक्षित बाल कलाकारांनी भरतनाट्यम तसेच गोमंतकातील पारंपरिक सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. बाल कलाकारांसोबत कुठ्ठाळी सांकवाळच्या गृहीणी कलाकारांनी पारंपरिक गीतांचे गायन व नृत्य सादर करून बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आगळा वेगळा अभिनय सादर केला. यावेळी उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या बालकलाकार व महिला कलाकारांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे कला दिग्दर्शक अमित दळवी यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून विविध खेळांचे आयोजन व सादरीकरण करवून घेतले.
यावेळी अनेक बालकलाकार व महिलांनी केलेल्या देशभरातील विविध राज्यातील लोकांची वेशभूषा करून विविधतेने नटलेल्या भारत देशाची अनुभूती दिली. या विविधतेतून एकतेमुळे सामाजिक सद्भभावना वाढीस लागून बंधुभाव जोपासण्याचे महान कार्य संस्थेच्या माध्यमातून घडविण्यात आले. पारितोषिक वितरण कार्यक्रमानंतर राजाराम शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment