
श्री कल्मेश्वर मंदिर कालकुंद्री येथे बोलताना आमदार शिवाजीराव पाटील
चंदगड : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) गावातील जागृत ग्रामदैवत श्री कल्मेश्वर मंदिर जिर्णोद्धार काम अनेक अडथळ्यांमुळे रखडले आहे. शैक्षणिक दृष्ट्या प्रगत, अधिकाऱ्यांचा गाव असा लौकिक असलेल्या गावातील मंदिराचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. ही बाब गावाला भूषणावर नाही असे प्रतिपादन चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी कालकुंद्री येथील ग्रामदैवत श्री कल्मेश्वर मंदिर येथे बोलताना दिली.
![]() |
| पहिली देणगी पावती मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना रामराव पाटील |
चंदगड तालुक्याला शिक्षणाची दिशा देणाऱ्या गावातील मंदिर बांधकामात प्रगती का होत नाही? या मागची कारणे शोधण्यासाठी व माहिती घेण्यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुद्दाम स्वतः नियोजन करून आमदार झाल्यानंतर कालकुंद्री येथे प्रथमच भेट दिली.
![]() |
| श्री कल्मेश्वर मंदिर येथे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर |
श्री कलमेश्वर मंदिर जिर्णोद्धार बांधकामाच्या प्रगतीची पाहणी केल्यानंतर मंदिर आवारात ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी विद्यमान जीर्णोद्धार बांधकाम कमिटी, ट्रस्ट मंडळ, सेवा मंडळ तथा गावातील हक्कदार सात पाटील, सप्ताह कमिटी व देवस्थान जमीन कसणारी कुळे यांना पाचरणे केले होते.
आमदार शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे स्वागत सरपंच सौ छाया जोशी व उपसरपंच संभाजी पाटील यांनी केले. प्रास्ताविक बांधकाम कमिटी सचिव प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील यांनी केले. बांधकाम कमिटी तथा तंटामुक्त कमिटी अध्यक्ष मनोहर पाटील यांनी मंदिर बांधकाम प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी श्री कल्मेश्वर ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ पाटील, सप्ताह कमिटी अध्यक्ष शंकर पाटील आदींनी जिर्णोद्धार बांधकामाला आमचा कोणताही अडथळा नसल्याची ग्वाही दिली. या घोषणेचे उपस्थित शेकडो ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. त्यामुळे मंदिर बांधकाम गतिमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवातीपासून मार्गदर्शन करणारा हा गाव असून येथील ग्रामदैवताच्या मंदिराचे रखडलेले बांधकाम पाहून मनाला वेदना झाल्या. पण यापुढील काळात हे काम वेगाने होईल. यापुढे बांधकामात येणाऱ्या अडथळ्यांचा मी स्वतः लक्ष घालून निपटारा करणार आहे. अशी स्पष्ट ग्वाही यावेळी आमदार पाटील यांनी दिली. कालकुंद्री गाव जिल्ह्यातील एक सधन गाव म्हणून परिचित आहे. त्यामुळे या मंदिराला कोणत्याही प्रकारची आर्थिक कमतरता भासणार नाही. तरीही मंदिर सभा मंडप साठी आपल्या फंडातून ५१ लाख रुपयांचा निधी देत असल्याचे जाहीर केले. मंदिरासाठी निधी कमी पडल्यास पुन्हा ५१ लाख रुपयांची देणगी देऊ असे सांगतानाच दुरावस्थेतील हनुमान मंदिर साठी तात्काळ १० लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली.
आमदार यांच्या हस्ते यावेळी देणगी पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. २ लाख ५१ हजार रुपयांची पहिली देणगी पावती मुंबई येथील उद्योजक रामराव हरिभाऊ पाटील यांनी घेतली. यावेळी माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील. माजी जि प सदस्य सचिन बल्लाळ, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील, सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, प्रिया मुंगुरकर- जोशी, आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष शरद जोशी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मंदिर संबंधित सर्व कमिट्यांचे सदस्य, मंदिर बांधकाम ठेकेदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदारांनी गावात प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन केले. ग्रामस्थांनी आमदार पाटील यांचे लेझीम पथकाच्या गजरात मंदिरापर्यंत जल्लोषी मिरवणुकीने स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक कांबळे यांनी केले. बांधकाम कमिटी सदस्य शंकर कोले यांनी आभार मानले.


No comments:
Post a Comment