निपाणी : सी. एल. वृत्तसेवा
कणगला (ता. चिकोडी) येथील रहिवाशी सुभेदार मेजर, ऑनररी लेफ्टनंट रवींद्र गोविंद चव्हाण १२ मराठा लाईट इन्फंट्री मधून ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यांच्या सेवानिवृत्ती निमित्त भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १ जानेवारी २०२६ रोजी महादेव मंदिर, कणगला येथे सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी खासदार रमेश कत्ती भूषवणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल अमरसिंह सावंत, कर्नल विक्रम नलवडे, कर्नल धनाजी देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आजी-माजी सैनिक संघटना व मित्र मंडळ कणगला यांच्यावतीने रवींद्र चव्हाण यांचे बंधू निवृत्त सुभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट गजानन गोविंद चव्हाण यांनी केले आहे.
सेवानिवृत्ती सन्मान सोहळ्यानिमित्त सकाळी १० वाजता सुभेदार मेजर रवींद्र चव्हाण यांची गावातून कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर दुपारी ११.३० ते १.३० पर्यंत सत्कार व शुभेच्छा समारंभ व त्यानंतर स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय आर्मीच्या इतिहासातील दुर्मिळ घटना
मुळगाव कणगला व सध्या निपाणी येथे वास्तव्य असणारे सुभेदार मेजर गजानन ७ मराठा व रवींद्र चव्हाण १२ मराठा हे दोघे सख्खे बंधू भारतीय आर्मीत एकाच वेळी सुभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट अशा एकाच पदावर कार्यरत होते. ही भारतीय आर्मीच्या इतिहासात दुर्मिळ घटना ठरली आहे.
दोन्ही बंधूंना दिवंगत वडील स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक गोविंद भुजिंगा चव्हाण (निपाणी परिसरात गोविंद मामा चव्हाण म्हणून ओळखले जाणारे) यांच्याकडून देशसेवेचा वसा आणि वारसा लाभला आहे. तर आई कै. कृष्णाबाई यांच्याकडून देशसेवेची प्रेरणा मिळाली आहे. या प्रेरणेमुळे दोन्ही बंधूंनी ३४ वर्षे देशाच्या सीमांचे रक्षण केले. मोठे बंधू गजानन चव्हाण हे मागील वर्षी आपल्या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ देशसेवेतून निवृत्त झाले आहेत.
स्वर्गीय स्वातंत्र्यसेनानी गोविंदमामा चव्हाण यांनी सन १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन तुरुंगवास भोगला तर १९४४ च्या दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांच्या बाजूने त्यांच्या सैन्यातून सात देशांतील लढायांमध्ये सहभाग घेतला होता. १९४६ मधील भारत छोडो आंदोलन, १९४७ चा भारत स्वतंत्र संग्राम, १९४८ मध्ये महात्मा गांधी यांची झालेली हत्या जाळपोळ यामुळे देशात आलेली अस्थिरता, १९५० मधील भारताचे संविधान लागू करण्याच्या वेळी असलेली तणावग्रस्त परिस्थिती व १९६२ मधील भारत चीन युद्ध अशा विविध प्रसंगी त्यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात एकूण ४ लढाया व चळवळीमध्ये भाग घेऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. त्यांचा वारसा भारतीय आर्मीत दाखल झालेल्या गजानन व रवींद्र चव्हाण बंधूनी जपला आहे आणि वाढवला आहे याचा देशवासियांना सार्थ अभिमान वाटतो. म्हणूनच निपाणी, चिकोडी, कणगला परिसरात या कुटुंबाचे नाव आदराने घेतले जाते.
दोन्ही बंधूंना आई-वडिलांसह त्यांच्या पाच बहिणी अनुसया, विमल, मंगल, कमल, सुनिता यांचे आशीर्वाद आणि पाठबळ तर दोन्ही बंधूंच्या पत्नींची समर्थ साथ लाभली आहे.
सुभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट रवींद्र चव्हाण यांना आर्मी मधील ३४ वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीनंतर उर्वरित आरोग्य संपन्न दीर्घायुष्यासाठी चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित 'सी. एल. न्यूज' चे सर्व पत्रकार, हजारो सभासद व लाखो वाचक यांच्यावतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....!


No comments:
Post a Comment