तालुक्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही....! संजय गांधी निराधार योजना कमिटी अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांची ग्वाही...! सर्व अर्ज मंजूर - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2025

तालुक्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही....! संजय गांधी निराधार योजना कमिटी अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांची ग्वाही...! सर्व अर्ज मंजूर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील खरे गोरगरीब लाभार्थी यापुढे संजय गांधी निराधार योजने पासून वंचित राहणार नाहीत. राजकीय अभिनेवेश न ठेवता सर्व वंचित घटकांना या योजनेचा लाभ दिला जाईल! अशी निःसंदिग्ध ग्वाही योजनेचे चंदगड तालुका अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांनी दिली. ते चंदगड येथील काल झालेल्या संजय गांधी निराधार योजना कमिटीच्या पहिल्या बैठकीत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. योजनेच्या पहिल्याच बैठकीत सादर करण्यात आलेल्या २९१ पैकी सर्वच प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आले. या योजनेतून एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने प्रस्ताव मंजूर करण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी.

अर्ज मंजूरीच्या प्रस्तावावर सही करताना तालुकाध्यक्ष लक्ष्मण गावडे, शेजारी भारती जाधव

        संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक मंगळवार दि. ३० रोजी चंदगड येथील तहसिल कार्यालयात पार पडली. संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती चंदगड तालुकाध्यक्ष लक्ष्मण विश्राम गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तहसिलदार राजेश चव्हाण प्रमुख उपस्थित होते. 

    समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हि पहिलीच बैठक होती. यामध्ये आपल्या कामाची पोचपावती देत गावडे यांनी अधिकाऱ्यांच्या मदतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या २९१ पैकी २९१ प्रस्ताव पहिल्याच वेळी मंजूर केले. यावेळी नायब तहसिलदार प्रकाश जोशीलकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किल्लेदार कमिटीचे सदस्य सौ. श्रीलक्ष्मी जाधव, महादेव सांबरेकर, भरमु तातोबा पाटील, वैजनाथ हुसेनकर, जोतिबा गोरल, यांच्यासह सुरेश कांबळे व सौ. शीतल कट्टी आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment