'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद, नरेवाडीत आमदार शिवाजीराव पाटील यांचा शेतकऱ्यांशी संवाद; काजू कलमांचे वाटप, वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2026

'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद, नरेवाडीत आमदार शिवाजीराव पाटील यांचा शेतकऱ्यांशी संवाद; काजू कलमांचे वाटप, वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ


चंदगड, प्रतिनिधी : 

राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' या राज्यस्तरीय उपक्रमाला चंदगड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील नरेवाडी येथे आयोजित भात रोपलावणी कार्यक्रमात चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी शेतात उतरून प्रत्यक्ष रोपलावणीत सहभाग घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना मोफत काजू कलमांचेही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, "शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेतीची प्रगती आणि अन्नदात्या बळीराजाचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारा आहे."

याच कार्यक्रमात हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच चंदगड तालुक्यात विविध ठिकाणी काजू कलमांचे मोफत वाटप करून पर्यावरण संवर्धनासह शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमास गडहिंग्लजचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण, तहसीलदार ऋषिकेश शेळके, तालुका कृषी अधिकारी विवेकानंद चव्हाण, सहाय्यक कृषी अधिकारी जीवन पालमपल्ले, मारुती कराळे, शैलेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे शेतकरी, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन आधुनिक शेती, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत कृषी विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment