एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त चंदगड आगारात ३०० वृक्षांचे रोपण - चंदगड लाईव्ह न्युज

14 July 2026

एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त चंदगड आगारात ३०० वृक्षांचे रोपण

चंदगड आगारामध्ये वृक्षारोपण करताना तहसिलदार राजेश चव्हाण, शेजारी आगार प्रमुख सतीश पाटील व इतर कर्मचारी.

चंदगड, दि. १४ जुलै : 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यभर राबविण्यात आलेल्या व्यापक वृक्षारोपण अभियानाचा एक भाग म्हणून चंदगड एसटी आगारात मंगळवारी ३०० विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या अभियानाचा शुभारंभ तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

वृक्षारोपण करताना पत्रकार संपत पाटील, एस. टी. चे अधिकारी व कर्मचारी

हरित महाराष्ट्राचा संकल्प अधिक बळकट करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. राज्यव्यापी वृक्षारोपण अभियान पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ करणारे ठरेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

महामंडळाने सर्व विभागांना जारी केलेल्या परिपत्रकानुसार बसस्थानके, आगारे आणि विभागीय कार्यालयांच्या परिसरात स्थानिक हवामानास अनुरूप तसेच दीर्घकाळ टिकणाऱ्या स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वृक्षारोपणानंतर रोपांची नियमित देखभाल आणि संगोपन करण्यावरही विशेष भर देण्यात आला असून हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता सातत्याने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी चंदगड आगार प्रमुख सतीश पाटील यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास सहायक वाहतूक अधिकारी विशाल शेवाळे, वाहतूक निरीक्षक विनायक बेडगे, चंदगड तालुका पत्रकार संघाचे खजिनदार पत्रकार संपत पाटील यांच्यासह आगारातील चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. या अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, विद्यार्थी, एसटी कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment