चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील बांदराईवाडा येथे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर कोयता व दगडांनी हल्ला केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद वन विभागाचे जखमी कर्मचारी लुड्रीना जॉन्सन डिसोझा वय ३९, (मुळगाव बाचणी, तालुका कागल) यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, पाटणे वनक्षेत्र विभागाचे कर्मचारी बांद्राईवाडा येथे सोमवार दिनांक १३ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता तेथील वन हद्दीत केलेली अतिक्रमणे हटवण्यासाठी गेले होते. या पथकात डिसोजा यांच्यासह वनसेवक मोहन तुपारे, राहुल दळवी यांचा समावेश होता. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना अचानकपणे विमल विठ्ठल लांबोर, आरती विठ्ठल लांबोर, जेनाबाई सुभाष लांबोर आणि लक्ष्मी सुभाष लांबोर, सर्व रा. बांदराईवाडा, (ता. चंदगड) या महिलांनी शिवीगाळ करत कोयते व दगडांनिशी पथकावर हल्ला केला व जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात वरील तिघे कर्मचारी जखमी झाले. फिर्यादी नंतर वरील सर्व संशयितांवरुद्ध चंदगड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. चौगुले करीत आहेत.

No comments:
Post a Comment