चंदगड तालुक्यात पावसाची संततधार; नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ, ६ बंधारे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2026

चंदगड तालुक्यात पावसाची संततधार; नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ, ६ बंधारे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

 

ताम्रपर्णी नदीवरील कोनेवाडी बंधाऱ्यावर पुराचे आलेले पाणी

चंदगड / प्रतिनिधी : 

    चंदगड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेल्याने काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नद्यांचे पाणी पात्राबाहेर येऊन पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोनेवाडी बंधारा पाण्याखाली गेल्याने कोनेवाडी-नागनवाडी मार्गावरील संपर्क तुटला. त्यामुळे कोनेवाडीतील नागरिकांना चंदगडला जाण्यासाठी नांदवडे-हेरे-चंदगड असा वळसा घालावा लागत असून वेळेसह आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

    घटप्रभा मध्यम प्रकल्प परिसरातील पिळणी, बिजूर, भोगोली, हिंडगाव, कानडी-सावर्डे, अडकूर तसेच कोनेवाडी येथील बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने नागरिकांना बंधाऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यातून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

    दरम्यान, पावसामुळे शेतीकामांना वेग आला असून भात रोपलावणीच्या कामांना गती मिळाली आहे. मात्र, सततच्या पावसामुळे चंदगड, कोवाड, अडकूर, हलकर्णी आणि पाटणे फाटा येथील आठवडी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याने व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

    आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दुपारनंतर काहीसा उघडीप मिळाली; मात्र सायंकाळी पाचनंतर पुन्हा मुसळधार पावसाने जोर धरल्याने शिवार जलमय झाले. मोठ्या थेंबांचा पाऊस आणि अधूनमधून सुरू होणाऱ्या जोरदार सरींमुळे नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.

    याशिवाय, वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment