तेऊरवाडी येथे बिबट्याचा वावर, ग्रामस्थांना सतर्कतेचे वनविभागाचे आवाहन, जंगली प्राण्यांच्या वावराने शेतकरी हैराण - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2026

तेऊरवाडी येथे बिबट्याचा वावर, ग्रामस्थांना सतर्कतेचे वनविभागाचे आवाहन, जंगली प्राण्यांच्या वावराने शेतकरी हैराण

संग्रहित छायाचित्र

तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा (एस. के. पाटील)

कर्यात भागात गेल्या महिन्याभरात संचार करणाऱ्या बिबट्याने मलतवाडी,दुंडगे असा प्रवास करत तेऊरवाडी (ता. चंदगड ) गावच्या हद्दीत प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे.

काल सायंकाळी तेऊरवाडी गावाच्या पश्चिमेला नेसरी कोवाड या मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या पठार नावाच्या शेतामध्ये यूल्लूबाई लक्ष्मण हेंडोळे या वृद्धेला सायंकाळी 6.30 च्या दरम्यान बिबट्या शेतामध्ये लोळण घेत असताना दृष्टीला पडला. घाबरलेल्या यल्लूबाईनी घरी  व गावी या घटनेची माहिती दिली. पत्रकार एस के पाटील यानी वनविभागाला या बिबट्याच्या वावरा संदर्भात कळवल्यानंतर तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी धाव घेत खात्री करून घेतली . सध्या या परिसरात ऊस गवत असल्याने बिबट्याचा शोध घेणे अवघड आहे तसेच गावाला लागून प्रचंड मोठे जंगलक्षेत्र आहे. या जंगलात सर्वच प्राण्यांचा वावर आहे. दुसऱ्यांदा या परिसरात बिबट्याचे आगमन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. अगोदरच कोरडवाहू गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तेऊरवाडी गावच्या परिसरात जंगली प्राण्यांच्या उपद्रवाने ग्रामस्थ हतबल झाले आहेत.

 हजारो हेक्टर सुपिक जमिन पड

तेऊरवाडी गावच्या उत्तरेला संपूर्ण जंगलक्षेत्र आहे. जंगलात असणाऱ्या गवी रेड्यांच्या कळपाकडून संपूर्ण पिकांची प्रचंड नासधूस होत असल्या कारणाने शेतकऱ्यांनी या जंगल पायथ्यालगत असणारी हजारो हेक्टर जमिन पड पाडली आहे.

 22 वानरांच्या माकड चेष्टानी ग्रामस्थ हैराण 

गेल्या दोन वर्षापासून तेऊरवाडी गावातच 22 वानरांचा कळप वावरत आहे. एका घरावरून  दुसऱ्या घरावर माकडांच्या उड्यानी शेतकऱ्यांच्या घरांची कौले फुटल्याने घरांचे प्रचंड नुकसान होत आहे. तसेच या माकडाकडून नारळ, केळी, आंबा, चिकू, शेवगा, पेरू आदि फळझाडे उध्वस्थ केली जात आहेत. हि माकडे येवढी निडर झाली आहेत की चक्क घरांची कौले काढून घरातील विविध खाण्यायोग्य वस्तू पळवत आहेत. या माकड चेष्टानी ग्रामस्थ हैराण झाले आहे.

त्यातच सध्या दुष्काळातून वाचलेले पिक घरी आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांना आता भिती आहे ती बिबट्याची. या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी तेऊरवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

No comments:

Post a Comment