गोकुळ बाबतच्या सत्ता संघर्षाचा चंदगड तालुक्यात निषेध, पाटणे फाटा येथे समविचारी आघाडी कडून स्वीकृत सदस्य निवड अध्यादेशाची होळी - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2026

गोकुळ बाबतच्या सत्ता संघर्षाचा चंदगड तालुक्यात निषेध, पाटणे फाटा येथे समविचारी आघाडी कडून स्वीकृत सदस्य निवड अध्यादेशाची होळी

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    नुकत्याच पार पडलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर नियमबाह्य पद्धतीने संस्था बळकवण्यासाठी सुरू असलेल्या सरकार पुरस्कृत हस्तक्षेपाचा चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथे निषेध करण्यासाठी समविचारी आघाडी, तालुक्यातील विविध पक्ष व दूध उत्पादक एकवटले. यावेळी तीव्र शब्दात निषेध करून गोकुळ वर शासनाने नियुक्त केलेल्या चार स्वीकृत सदस्य निवडीच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.

    कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे साडेपाच लाख दूध उत्पादकांना हक्काची रोजी रोटी मिळवून देणारी संस्था म्हणजे गोकुळ दूध संघ. शेतकरी ऊन वारा चिखल पाऊस अशा खडतर परिस्थितीतून वैरण आणणे, गाई म्हशींचे शेण मुत काढून, घाम गाळून उत्पादित केलेल्या दर्जेदार दुधाचा पुरवठा गोकुळ दूध संघाला करतो. पुरवठा केलेल्या दुधाला गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून महिन्याकाठी सुमारे दीडशे कोटी रुपये जिल्ह्यातील दूध उत्पादकांना त्यांच्या घामाचे दाम म्हणून मिळतात. बे भरवशाच्या शेतीला जोडधंदा म्हणून हक्काचे दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. या दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यात एकीकडे सत्ताधारी महायुती शासनाचा पाठिंबा असलेले पॅनल तर विरोधात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीचे पॅनेल अशी लढत झाली. यात २५ पैकी १३ समविचारी पॅनलचे तर महायुती पॅनलचे १२ सदस्य निवडून आले.

 बहुमत मिळालेल्या समविचारी आघाडीची दूध संघावर सत्ता येणार हे अपेक्षित होते. तथापि महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती रडीचा डाव खेळत चार शासकीय स्वीकृत सदस्य संचालक मंडळात घुसवून सत्ता काबीज करण्याचा खटाटोप सुरू केला आहे. असा आरोप समविचारी पॅनलचे समर्थक असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक व नागरिकांतून तीव्र नाराजी व संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याचे पडसाद राज्य व राष्ट्रीय पातळीवर उमटत उमटताना दिसत आहेत.

   गोकुळ दूध संघात होत असलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप प्रणित सरकारचा होत असलेल्या हस्तक्षेपाचा निषेध तसेच यासंदर्भात ९ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या महामोर्चा बाबत जनजागृती करण्यासाठी आज दि. ७/११/२०२६ रोजी चंदगड तालुक्यातील बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील पाटणे फाटा येथे समविचारी पॅनलचे समर्थक, दूध उत्पादक, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, आदी पक्ष, विविध शेतकरी संघटना कार्यकर्त्यांनी एकत्र येत जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी गोकुळ संस्थेवर वर्चस्व राखण्यासाठी शासन नियुक्त चार सदस्य निवडीच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.

    यावेळी उपस्थित काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसचे नेते एम. जे. पाटील, गोपाळ पाटील, संभाजी देसाई शिरोलीकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विष्णू गावडे, बळीराजा संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, भैरू खांडेकर, संघर्ष प्रज्ञावंत अभिजीत गुरबे यांनी आपल्या, भाषणातून वरील शब्दात शासकीय हस्तक्षेपाचा तीव्र निषेध केला. यावेळी शेकडोंच्या संख्येने दूध उत्पादक सभासद व नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment