हायस्कूलच्या स्वयंपाक खोलीतील लाकडांत आढळले अति विषारी घोणस नर- मादी...! सर्पमित्र प्रा. पाटील यांच्याकडून रेस्क्यू - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2026

हायस्कूलच्या स्वयंपाक खोलीतील लाकडांत आढळले अति विषारी घोणस नर- मादी...! सर्पमित्र प्रा. पाटील यांच्याकडून रेस्क्यू



चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व माडखोलकर महाविद्यालयाच्या शालेय पोषण आहार स्वयंपाक खोलीतील जळाऊ लाकडांत जहाल विषारी नर व मादी घोणस मिलन अवस्थेत आढळले. या दोन्ही सापांना पकडून ढोलगरवाडी सर्प शाळेचे सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील यांनी जंगलात सोडून दिले.

      दि. ३०/१०/२०२६ रोजी शाळेत आल्या आल्या कुकरच्या शिट्टीसारखा आवाज लाकडातून येऊ लागला. त्याच वेळेला लाकूड फाटा उचलताना शिक्षकेतर कर्मचारी गोंधळी यांना ते साप निदर्शनास आले. शाळेत कुकरच्या सिटी सारख्या अर्धा तासाच्या आवाजाने एकच धांदल उडाली. विद्यालयातील शिक्षक व पर्यावरण मित्र सुभाष बेळगावकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सर्पमित्र सदाशिव पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी १५-२० मिनिटात हायस्कूलमध्ये येऊन लाकडांमध्ये लपलेल्या दोन्ही सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू केले. 

   यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी विद्यार्थी यांना या सापांची शास्त्रीय माहिती दिली. या सापाचे विष हिमोटॉक्सिक गटात मोडते. याला सड्या, कुसड्या साप म्हणतात लोक या सापाला सुस्त मानत असले तरी या सापाची अटॅक पोज अतिशय फास्ट आहे. सेकंदाच्या नवव्या भागात तो अटॅक करतो. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात त्यांचा मिलन कालावधी असल्याने ते बऱ्याच वेळा जोडीने आढळतात. यामुळे गवत किंवा भात कापताना, शेतीची कामे करताना अडगळीच्या खोल्यांमध्ये वावर करताना सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. घोणस साप अंडी घालण्याऐवजी थेट पिलांना जन्म देतो. एका वेळी जन्म घेणाऱ्या पिलांची संख्या तब्बल ५० ते ६० पर्यंत असू शकते. त्यामुळे यांची पैदास जास्त आहे. उपलब्ध खाद्य, लपायला जागा, दगड, लाकडे, ऊस, गवत आपल्याकडे खूप आहे. निसर्गाशी मिळत्याजुळत्या रंग व डिझाईन मुळे सहजासहजी दिसून येत नाहीत. बसताना गोल पॅड घालून बसतो. मारायला गेल्यास अंग फुगवतो त्यामुळे काठीचा मार सहजासहजी लागत नाही. म्हणूनच जुने जाणते लोक म्हणतात सापाला मारायच असेल तर डोक्यात मारलं पाहिजेत. मात्र साप हा पर्यावरण जीव चक्रातील एक महत्त्वाचा घटक असल्याने त्यांना मारणे चुकीचे ठरेल. शेतीतील पिकांचे नुकसान करणारे उंदीर, बेडूक, कीटक हे सापांचे खाद्य असल्यामुळे एक प्रकारे तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. साप आपणहून चावत नाही. मात्र पाय पडल्यास किंवा जवळ हालचाल झाल्यास संरक्षणासाठी चावतो. या सापाच्या बाईटने प्रचंड वेदना आणि सूज येते. त्यामुळे घोणस सापाचा चावा आहे हे आपल्याला समजून येते.

     धोके टाळण्यासाठी लाकडे, दगड, विटा, नको असलेल्या सामानाचे गठ्ठे, अडगळीचे साहित्य घराच्या आसपास ठेवू नका. ते हलवताना दक्षता घ्या. घराचा परिसर स्वच्छ ठेवा. शक्यतो पायात गनबूट वापरा. चुकून सर्पदंश झाल्यास भिऊ नका. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्या. सर्पदंश झालेले बरेचसे रुग्ण भितीपोटी दगावल्याची उदाहरणे अनेक आहेत. प्रथमोपचार झाल्यानंतर सोबतच्या लोकांनी रुग्णाला डॉक्टर किंवा हॉस्पिटल कडे हलवणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य असते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

    या एका आठवड्यात घरात किंवा शाळांमध्ये विविध प्रकारचे विषारी बिनविषारी साप सापडल्याच्या सात-आठ घटना घडल्याचे यावेळी सर्पमित्र सदाशिव पाटील यांनी सांगितले. यात जनता विद्यालय तुर्केवाडी येथे नाग, मौजे कार्वे येथे स्वयंपाक घरात नाग, याशिवाय तडशीनाळ, माणगाव आदी ठिकाणी घरातच विषारी साप आढळले. त्यांना पकडून जंगलामध्ये रेस्क्यू करण्यात आले.

   चंदगड तालुका सह्याद्री डोंगर रांगांच्या लगत असल्याने येथे असलेल्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. किंग कोब्रासह सर्व प्रकारच्या विषारी बिनविषारी सापांच्या प्रजाती येथे आढळतात. अनेक वेळा लोकवस्ती त साप शिरतात. सर्पदंशाच्या घटना अनेक वेळा घडत असतात, या सर्वांमध्ये ढोलगरवाडी येथील सर्प शाळेचे योगदान मोठे आहे. तथापि येथील सर्प शाळेला गेली सत्तर वर्षे मागणी सुरू असूनही शासनाची एक रुपयांचा निधी मिळत नाही. उलट पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या ही सर्प शाळा बंद करण्याच्या नोटीसा वारंवार धडकत आहेत. हा शासनाच्या अजब कारभाराचा नमुना म्हणावा लागेल.

No comments:

Post a Comment