चंदगड : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दि. ८/१०/२०२६ गुरुवार आठवडी बाजाराच्या दिवशीच अचानक कोवाड (तालुका चंदगड) बाजारपेठेत धडक दिली आणि हॉटेल, चहा भजी, वडापाव चे गाडे व्यवसायिकांमध्ये धडकी भरली. बघता बघता सर्व हॉटेल्स, वडापाव गाडे, टपऱ्या पटापट बंद झाल्या. या प्रकाराची बाजारपेठेतील स्थानिक व बाहेरगावच्या ग्राहकांमध्ये चवदार चर्चा रंगली होती.
महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तडफदार अधिकारी तुकाराम मुंढे यांनी ५-६ महिन्यापूर्वी पदभार स्वीकारला. आपल्या २१ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत २५ वेळा बदल्या झालेला हा एकमेव धडाकेबाज अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभागात आल्यापासून अधिकच चर्चेत आला आहे. शासन ज्या विभागात बदली करेल त्या विभागाचे शुद्धीकरण सुरू करतो. केवळ सहा महिन्यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारताच अन्नधान्य, तेल, दूध यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले होते. मुंडे येण्यापूर्वी महाराष्ट्रात दूध उत्पादन होते त्यापेक्षा लाखो लिटरनी ते कमी झाले आहे. यावरूनच दूध व्यवसायात बोगस व भेसळयुक्त दूध किती होते हे लक्षात येते. ग्राहक व नागरिकांना अन्नधान्य, दूध, तेल व इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करून विष खाऊ घालणाऱ्या या बेसळखोरांना तुकाराम मुंडे यांनी अद्दल घडवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या क्षेत्रातील हजारो गुन्हेगारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे या विभागाची संबंधित क्षेत्रातील व्यावसायिकांनी चांगलीच धास्ती घेतलेली दिसते.
मागील आठवड्यात या पथकाने चंदगड या तालुक्याच्या ठिकाणी अचानक धाड घालताच सर्व प्रकारचे हॉटेल धाबे वडापाव चे गाडे टपऱ्या क्षणात बंद करून व्यवसायिक गायब झाले. अक्षरशः पळापळ सुरू झाली होती. तीच अवस्था आज कोवाडची झाली. हे पथक दुपारी येथे आल्याची चाहूल लागताच सर्व व्यावसायिक आपले व्यवसाय बंद करून गायब झाले. बाजार दिवशी फुल्ल चालणारे हॉटेल व खाद्यपदार्थांचे व्यवसायिक कुठे गायब झाले? अशी विचारणा ग्राहकांनी सुरू करताच वरील प्रकार लक्षात आला. या प्रकारानंतर बाजारातील आलेले आलेल्या ग्राहकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली योग्य पद्धतीने व्यवसाय सुरू असेल तर या पथकाला घाबरण्याचे कारणच काय? कुठेतरी पाणी मुरत आहे अशी चर्चा बाजारपेठेत चवीने सुरू होती.

No comments:
Post a Comment