वृद्धेच्या गळ्याला चाकू लावून लुटणारा पोलिसांच्याकडून जेरबंद.., अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2026

वृद्धेच्या गळ्याला चाकू लावून लुटणारा पोलिसांच्याकडून जेरबंद.., अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

 


तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा

    हडलगे बंधाऱ्याजवळ जनावरे चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बाळू लक्ष्मण कर्लेकर (वय ५०, रा. संतीबस्तवाड, जि. बेळगाव) या संशयिताला ५ ऑक्टोबरला हिटणी फाटा येथे सापळा रचून कारवाई करण्यात आली. या संशयित आरोपीने तपासात पंढरपूरमधील दुचाकी चोरल्याचेही स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी की, मागील आठवड्यात दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास हडलगे बंधाऱ्याजवळील पडीक जमिनीत फिर्यादी महिला जनावरे चारत होती. त्यावेळी एकाअनोळखी व्यक्तीने तिला खाली पाडले. खांद्यावर गुडघा ठेवून मानेवर चाकू लावला आणि ओरडल्यास ठार मारण्याची धमकी दिली. महिलेला जखमी करून तिच्या गळ्यातील सोन्याचे मणी, मंगळसूत्र आणि दोन्ही कानांतील कर्णफुले जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर दुचाकीवरून पलायन केले होते . या दिवसा घडलेल्या घटनेने नेसरी कोवाड परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

    याप्रकरणी नेसरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी समांतर तपासाच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार केले.

    पथकाने रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रण आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. पोलीस अंमलदार अनिकेत मोरे, समीर कांबळे आणि सचिन जाधव यांना आरोपी कर्लेकर हिटणी फाट्यावर येणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी सापळा रचून संशयीत आरोपीला होंडा लिव्हो दुचाकीसह पकडण्यात आले.

    


चौकशीत 
संशयीत आरोपीने वृद्धेला लुटल्याची तसेच दुचाकी पंढरपूर येथून चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दुचाकी चोरीबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल असल्याचे तपासात स्पष्ट झाले. अशा प्रकारे या कारवाईत दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

    आरोपीकडून कायदेशीर प्रक्रियेद्वारे १४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा एकूण २ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी नेसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसानी आठवड्यातच या गुन्हाचा तपास लावल्याने समाधान वक्त केले जात आहे.

No comments:

Post a Comment