किटवाडमध्ये किल्ला बांधणी स्पर्धेला मोठा प्रतिसाद, रायगड किल्ला प्रतिकृती प्रथम, कांजूरमार्ग मित्र मंडळाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2026

किटवाडमध्ये किल्ला बांधणी स्पर्धेला मोठा प्रतिसाद, रायगड किल्ला प्रतिकृती प्रथम, कांजूरमार्ग मित्र मंडळाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन



कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

       किटवाड, ता. चंदगड : दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त कांजूरमार्ग मित्र मंडळाच्या वतीने किटवाड गावमर्यादित भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला गावातील बालचमूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सलग पंधरा दिवस अहोरात्र मेहनत घेऊन मुलांनी विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीसमोर जिवंत करण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला. मारुती विठोबा मोदगेकर आणि विनोद कसलकर यांनी किल्ल्यांचे परीक्षण केले.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे

प्रथम क्रमांक – किल्ले रायगड

पप्पू नांदवडेकर, रामा पाटील, अजिंक्य पाटील व अर्णव पाटील.

द्वितीय क्रमांक – किल्ले प्रतापगड

वृषभ पाटील, सुमित पाटील व हर्ष.

तृतीय क्रमांक – किल्ले सुवर्णदुर्ग

टाकीखालची पोरं.

बक्षीस वितरण प्रसंगी पिराजी पाटील, गुंडूराव बाबुराव पाटील, मल्लाप्पा नरेवाडकर, प्रतीक पाटील, आकाश सरमळकर, भरमा लाड, महेश मोहिते व विठ्ठल शिंगटे उपस्थित होते.


किल्ल्यांच्या माध्यमातून इतिहासाची जपणूक

दिवाळीच्या सुट्टीत मोबाईल आणि आधुनिक मनोरंजनाच्या विश्वापासून दूर राहून मुलांनी माती, दगड, विटा आणि उपलब्ध साहित्याचा वापर करत ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या. प्रत्येक किल्ल्यामागे मुलांची कल्पकता, मेहनत, जिद्द आणि इतिहासाविषयीची आवड दिसून आली. किल्ले उभारताना मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व, त्यांची रचना, तटबंदी, बुरुज आणि स्वराज्याच्या पराक्रमाची माहिती मिळते. हा उपक्रम केवळ स्पर्धा नसून पुढील पिढीमध्ये इतिहासप्रेम, सांघिक भावना, सर्जनशीलता आणि संस्कार रुजविणारा एक सुंदर सांस्कृतिक वारसा आहे.

  गावातील अशा उपक्रमांमुळे मुलांना आपले कौशल्य दाखविण्यास व्यासपीठ मिळते, तर मोठ्यांकडून मिळणारे प्रोत्साहन त्यांच्या उत्साहात भर घालते. स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रतिक पाटील, गुंडुराव पाटील, मल्लेश नरेवाडकर, भरमा लाड , दिलीप हान्नुरकर, महेश मोहिते , विठ्ठल शिंगटे , भरमू पाटील,आकाश सरमळकर या सर्वांनी परिश्रम सहभागी होत सहभागी मुलांचे कांजूरमार्ग मित्र मंडळाच्या वतीने कौतुक केले.

   दिवाळीच्या प्रकाशात उजळलेले हे छोटे छोटे गड-किल्ले म्हणजे मुलांच्या कल्पकतेचे आणि शिवइतिहासावरील प्रेमाचे जिवंत दर्शनच म्हणावे लागेल!

No comments:

Post a Comment