संकटात सापडलेल्या मित्रासाठी धावले वर्गमित्र, सिलिंडर स्फोटात भाजलेल्या सुरेश बागडी यांना माणगाव हायस्कूलच्या १९९६ बॅच वर्गमित्रांकडून आर्थिक मदत - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2026

संकटात सापडलेल्या मित्रासाठी धावले वर्गमित्र, सिलिंडर स्फोटात भाजलेल्या सुरेश बागडी यांना माणगाव हायस्कूलच्या १९९६ बॅच वर्गमित्रांकडून आर्थिक मदत

 


संपत पाटील, चंदगड : सी एल वृत्तसेवा 

        संकटाच्या काळात आपली माणसं धावून येतात, हीच मैत्रीची खरी ओळख असते. आयुष्यातील अनेक वर्षे उलटली, शाळेतील शिक्षण संपले, प्रत्येकजण आपापल्या संसारात रमला; मात्र शालेय जीवनात निर्माण झालेल्या मैत्रीच्या नात्यातील जिव्हाळा आजही टिकून असल्याचे माणगाव येथील वर्ग मित्रांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. 

       नवरात्रोत्सवाच्या काळात पहाटेच्या दौडसाठी आलेल्या मुलांच्या नाश्त्याची तयारी सुरू असताना झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात माणगाव येथील सुरेश महादेव बागडी यांचे पाय गंभीररीत्या भाजले. या अपघातामुळे त्यांचा मासेमारी व्यवसाय थांबला परिणामी त्यांच्यासह कुटुंबीयांसमोर उपासमारीची वेळ आली. वर्ग मित्रावर आलेल्या या संकटाची जाणीव ठेवून १९९६ सालच्या दहावीच्या वर्गमित्रांनी एकत्र येत रोख रुपये १०,००१/-आर्थिक मदत सुरेश बागडी यांच्याकडे सुपूर्द केली. केलेली मदत पैशात किती आहे यापेक्षा अडचणीच्या काळात आपली माणसं पाठीशी उभी राहतात, ही भावना यानिमित्ताने मोलाची समाजासाठी दिशादर्शक ठरली आहे. 

        याकामी सुनील बेनके, श्रीधर फडके, दिग्विजय फडके, युवराज फडके, परशराम शिवणगेकर, रानबा बेनके, सुनील बागडी, धनाजी दळवी, सुनील कुंभार, सागर नौकुडकर, सुनिता स्वामी, मंजुळा पिट्टूक, दयानंद मिश्रीकोटी, विद्या किल्लेदार, गजानन बेनके, श्रीधर गावडे, इराप्पा पिट्टूक, संदीप बेनके, गजानन सुरुतकर, संदीप कुंभार, रामू कांबळे आणि आप्पा चिंचणगी यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment