चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड-गडहिंग्लज मार्गावर वाळकोळी फाटा येथे विनापरवाना इमारती लाकडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वनविभागाच्या पथकाने पकडला. या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि लाकडासह एकूण ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
चंदगड वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक व वनसेवक हे चंदगड-गडहिंग्लज मार्गावर गस्त घालत असताना वाळकोळी फाटा येथे ट्रॅक्टरमधून इमारती लाकडाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी वनविभागाच्या पथकाने ट्रॅक्टर अडवून चालक दीपक निवृत्ती गावडे (रा. दाटे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यांच्याकडे लाकूड वाहतुकीचा परवाना मागितला. मात्र, त्यांच्याकडे कोणताही वैध वाहतूक परवाना आढळून आला नाही.
विनापरवाना लाकूड वाहतूक केल्याप्रकरणी भारतीय वन अधिनियम तसेच महाराष्ट्र वन नियमावली नुसार वनरक्षक चंदगड यांच्याकडे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि लाकूड असा एकूण ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला. जप्त केलेला मुद्देमाल संरक्षणाच्या दृष्टीने मध्यवर्ती रोपवाटिका, चंदगड येथील आवारात ठेवण्यात आला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक कोल्हापूर धैर्यशील पाटील व सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी चंदगड तुषार गायकवाड, वनपाल भारत खुटाळे, वनरक्षक रणजित पाटील व वनसेवक नितीन नाईक यांनी केली.

No comments:
Post a Comment