स्वतः अशिक्षित पण कुटुंबातील १५ सदस्य केले ग्रॅज्युएट, राष्ट्र उभारणीला वाहून घेतलेल्या तब्बल ९० सदस्यीय एकत्र कुटुंबाच्या आदर्श 'मातोश्री- कै. सावित्री रूक्माना मोरे'कै. सावित्री रूक्माना मोरे' - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2026

स्वतः अशिक्षित पण कुटुंबातील १५ सदस्य केले ग्रॅज्युएट, राष्ट्र उभारणीला वाहून घेतलेल्या तब्बल ९० सदस्यीय एकत्र कुटुंबाच्या आदर्श 'मातोश्री- कै. सावित्री रूक्माना मोरे'कै. सावित्री रूक्माना मोरे'

यांच्या निधनानिमित्त त्यांच्या विषयी थोडेसे....!

कुटुंबातील लहान थोर सर्व सदस्यांसोबत मातोश्री श्रीमती सावित्री रूक्माना मोरे

सी एल वृत्तसेवा : चंदगड/श्रीकांत पाटील

     आधुनिक भारताचा 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान' हा नारा आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून प्रत्यक्षात जगलेल्या, स्वतः अशिक्षित असूनही आपली मुले, मुली, नातवंडे, पणतवंडे अशा चार पिढ्या सुशिक्षित करून ९० सदस्यांच्या एकत्र कुटुंबाला राष्ट्र उभारणीचा विधायक दृष्टिकोन देऊन समाजात एकत्र कुटुंबाचा आदर्श निर्माण करणाऱ्या राकसकोप, ता. बेळगाव येथील रहिवाशी ९५ वर्षीय 'आदर्श मातोश्री- श्रीमती सावित्री रूक्माना मोरे' यांचे २४ सप्टेंबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने देहावसान झाले. त्यांच्या दिवस कार्य (सोमवार दि. ०५/१०/२०२६) निमित्त त्यांच्याविषयी थोडेसे....!!


      बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे मार्कंडेय नदीवरील धरण  कर्नाटक राज्यातील ज्या गावात आहे, त्या राकसकोप गावच्या सुनबाई, रूक्माना मोरे यांच्या सौभाग्यवती म्हणून म्हणून वयाच्या १८ व्या वर्षी मोरे यांच्या घरी पहिले पाऊल ठेवले. राकसकोप येथून केवळ ३ किलोमीटर अंतरावर परंतु महाराष्ट्र राज्यात असलेले तुडये (ता. चंदगड) हे सावित्री यांचे माहेर. तुडये पंचक्रोशीत स्वाभिमानी, कष्टाळू शेतकरी म्हणून परिचित असलेल्या लक्ष्मण कलजी यांची ही कन्या. लग्नानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात आल्या तरी दोन्ही गावातील भाषा संस्कृती भौगोलिक परिस्थिती सारखीच. जशी माहेरचे तसेच सासरचे कुटुंबीय प्रामाणिक व कष्टाळू.

      त्याच काळात मराठी बहुभाषिक भाग सक्तिने कर्नाटकात डांबल्याची सावित्री आईना फार चिड होती. भाषिक व प्रांतिक वादामुळे पुढील संकटांची चाहूल लागलेल्या सावित्री यांनी बालवयातच आपले चिरंजीव रामचंद्र, अरुण, संजय व कन्या मंजुळा/कावेरी मारुती ढेगसकर (अनगोळ) यांना सुशिक्षित व सुसंस्कारित करून स्वतःच्या पायावर उभे केले. 

   मोठे चिरंजीव रामचंद्र बी.एससी. शिक्षण घेऊन परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून सुपरिचित आहेत.  दुसरे चिरंजीव अरुण हे बी.एससी. शिक्षण घेऊन भारतीय सैन्यात दाखल झाले. सुभेदार पदापर्यंत पोहोचले. सेनादलातील ३० वर्षांची त्यांची सेवा तरुणांसमोर आदर्श ठरली आहे. सेवानिवृत्तीनंतरही तरुणांसाठी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.  लहान चिरंजीव यशस्वी मराठा उद्योजक संजय मोरे हे ऑटो इंजिनियर असून सीमा भागातील छत्रपती शिवरायांचे भक्त म्हणून चिरपरिचित आहेत. त्यांच्या शिव कार्याबद्दल त्यांना हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड किल्ल्यावर 'शिवसंत' या पदवीने गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनातील अग्रणी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत. कर्नाटकच्या जुलमी वरवंट्याखाली अडकलेल्या मराठा बांधवांना महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांची सहकाऱ्यांसोबत अविरत धडपड सुरू आहे.  पानिपतच्या तिसऱ्या युद्धात सैरभैर झालेल्या मराठा सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा तब्बल २५० वर्षानंतर पुन्हा शोध घेऊन त्यांना  एकत्र करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत' चे 'कर्नाटक राज्य समन्वयक' म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत (हरियाणा राज्यातील पानिपत- बसताडा येथे दरवर्षी १४ जानेवारी रोजी या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांसाठी आदरांजली वाहिली जाते). याशिवाय आग्रा येथील औरंगजेबाच्या नजर कैदेतून छ. शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेतली. त्या  घटनेच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी १७ ऑगस्ट रोजी आग्रा येथे होणाऱ्या शिव चातुर्य दिन - गरुड झेप मोहीमेच्या यशस्वीतेसाठी  ते अग्रेसर असतात. कर्नाटकातील ते एक यशस्वी उद्योजक असून  कॉलेज रोड- बेळगाव येथील यश ऑटो उद्योग समूहाचे मालक म्हणून परिचित आहेत. पेट्रोल व इलेक्ट्रिक दुचाकी वाहने विक्री बरोबरच दुरुस्ती व स्पेअर पार्ट क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 

   एक मुलगा शेती, दुसरा सैन्यातील जवान तर तिसरा विज्ञान व उद्योग क्षेत्रात आपले योगदान देत आहे. या तिन्ही बंधूंचे कार्यक्षेत्र पाहता मातोश्री सावित्री यांनी 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान' या उक्तीचा आदर्श आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून समाजाला दिला आहे. त्यांची नातवंडे अजय, विनायक, ज्योती, आकाश, आरती, यश, यशस्विनी, दिनेश, मीनाक्षी, ज्योती, सुना रेणुका, सुरेखा, सुषमा, अरुणा, अहिल्या आदी सर्व ग्रॅज्युएट असून विविध क्षेत्रात व देशातील विविध  शहरांत कार्यरत असून गावाचे नाव लौकिक करत आहेत. याशिवाय नातवंडे व पणतवंडे कौशल्या, राणोजी, रत्नोजी, सृष्टी, ओमकार, शिवांश, अर्जुन, विहानिका ही तिसरी आणि चौथी पिढी आजीच्या संस्काराखाली घडली आहे. सावित्री आजी म्हणजे घरातील ९० सदस्यांचा आधार, संस्काराची शिदोरी आणि आशीर्वादाची सावली देणाऱ्या वटवृक्ष होत्या. 

   राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊंची प्रेरणा व शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणी व संस्कारावर घडलेले मोरे कुटुंब म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे ठरते. वैचारिक वारशाने समृद्ध अशा या कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपला आधारवड ठरलेल्या 'आधुनिक सावित्री आईची'  ग्रंथ, पुस्तकांनी तुला करून त्यांच्या वजना इतकी पुस्तके गाव व परिसरातील शाळा, हायस्कूल वाचनालये यांना दान केली होती. हा उपक्रम समाजासमोर आदर्शवत ठरला होता.

   सावित्री मोरे यांच्या निधनामुळे केवळ मोरे कुटुंबीयच नव्हे तर गाव व परिसरातील नागरिक मायेची उब, आशीर्वाद देणाऱ्या हातांना पोरके झाले आहेत. त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार प्रसंगी चंदगड व बेळगाव तालुक्यासह सीमा भागातील जनसागर राकसकोप येथे लोटला होता. त्यांच्या अस्थींचे विसर्जन मार्कंडेय नदी व नृसिंहवाडी कृष्णा- पंचगंगा नदी संगमावर करण्यात आले. आज त्यांच्या दिवस कार्यानिमित्त  कुटुंबीयांसह सर्वांची साश्रू नयनांनी भावपूर्ण आदरांजली...!

No comments:

Post a Comment