गडहिंग्लजचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा, महाराष्ट्र बांधकाम उद्योग सेनेची पालकमंत्र्यांकडे मागणी; पाणी, चारा व खरीप पिकांच्या स्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याची विनंती - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2026

गडहिंग्लजचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा, महाराष्ट्र बांधकाम उद्योग सेनेची पालकमंत्र्यांकडे मागणी; पाणी, चारा व खरीप पिकांच्या स्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याची विनंती

 


गडहिंग्लज / प्रतिनिधी

पावसातील प्रदीर्घ खंड, पर्जन्यमानातील तूट आणि त्याचा शेती व पिण्याच्या पाण्यावर होणारा परिणाम लक्षात घेता गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करावा, अशी मागणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम उद्योग सेनेचे अध्यक्ष प्रशांत शिवाजीराव अनगुडे यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गडहिंग्लज तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे झाले नसून पावसाने घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे शेतीसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने खरीप पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून आगामी रब्बी हंगामाबरोबरच जनावरांसाठी चारा आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.

गडहिंग्लज हा कोल्हापूर जिल्ह्यातील मध्यम पर्जन्यमानाच्या पट्ट्यात येतो. त्यामुळे सरासरी पावसाच्या तुलनेत यंदाची तूट आणि पावसातील दीर्घ खंड यांचा शेती, भूजल पातळी आणि उपलब्ध पाणीसाठ्यावर नेमका किती परिणाम झाला आहे, याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सध्या जिल्ह्यातील काही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला असताना गडहिंग्लजचा त्यात समावेश झालेला नाही. मात्र प्रत्यक्ष ग्रामीण भागातील परिस्थिती पाहता येथील शेतकरीही दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करीत असल्याचा दावा महाराष्ट्र बांधकाम उद्योग सेनेने केला आहे.

तालुक्यात पर्जन्यमान, पिकांची स्थिती, जमिनीतील ओलावा, भूजल पातळी आणि पाणी उपलब्धता यांचा तातडीने आढावा घेऊन शासनाच्या दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांनुसार गडहिंग्लजचे पुनर्मूल्यांकन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती, पीक नुकसानभरपाई, पीक विमा, वीजबिलातील सवलती आदींचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी विहिरी, कूपनलिका, पाणीपुरवठा योजना, टँकर तसेच अन्य पर्यायी उपाययोजनांचे आतापासूनच नियोजन करावे, तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

गडहिंग्लजचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेला शासनाच्या मदतीचा आधार मिळवून देण्यासाठी आवश्यक आहे, असे प्रशांत अनगुडे यांनी निवेदनात म्हटले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment