कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कागणी (ता. चंदगड) येथील रहिवाशी कवी व पनवेल (जिल्हा रायगड) येथील अध्यापक महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य प्रा. डॉ. बी. जी. खाडे यांना मुंबई येथे 'राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार' देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
भारतीय सारस्वत मंडळ, शाखा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मराठी साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार नुकताच अंधेरी- मुंबई येथील श्री गणेश तलाव गार्डन हॉल, मरोळ येथे झालेल्या संस्थेच्या 'राष्ट्रीय लेखनी मराठी साहित्य संमेलन २०२६' अंतर्गत ४ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात (बीएड कॉलेज) त्यांनी अनेक वर्षे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून तर मुंबई विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. वर्षभरापूर्वी सेवेतून निवृत्त झालेल्या खाडे यांनी गेली अनेक वर्षे कविता लेखनाचा छंद जोपासला आहे. ग्रामीण लोकजीवनातील वास्तववादी चित्रण दाखवणाऱ्या त्यांच्या अनेक कविता वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या ठरल्या आहेत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'काय सांगू लेका तुला..!' व 'माझा बाप- तुझा बाप' आदी कवितांना सर्वोत्कृष्ट काव्यरचनेचा मान प्राप्त झाला आहे. मुळगाव कागणी असलेल्या, खाडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कागणी, माध्यमिक शिक्षण श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण गडहिंग्लज व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राध्यापक म्हणून सेवेच्या निमित्ताने गेली ३५ वर्षे त्यांचे वास्तव्य मुंबई- पनवेल परिसरात असले तरी सुट्टीच्या काळात ते नेहमी कागणी येथे असतात.
त्यांनी कवितांच्या माध्यमातून मराठी साहित्य क्षेत्राच्या उत्कर्षासाठी केलेली मराठी भाषेची सेवा, मराठी भाषा, मराठी माणूस व भारतीय साहित्याला उभारी देणारी आहे. साहित्य सेवेतील खाडे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना प्रदान करण्यात आलेला 'राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार' म्हणूनच सर्वार्थाने योग्य आहे. या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक डॉ. किरण कुलकर्णी, सारस्वत मंडळाचे राज्य अध्यक्ष सुरेश सकटे, आमदार मुरजी पटेल, साहित्यिक लालासो बनसोडे, नागनाथ डोलारे, वाणी केरकलमट्टी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. चंदगड सारख्या ग्रामीण भागातून जाऊन आपल्या सेवा व साहित्य लेखनाच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे सारख्या शहरी भागात वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्राध्यापक खाडे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर चंदगड तालुक्यासह मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षा होत आहे.

No comments:
Post a Comment