​'एक गाव एक गणपती' उपक्रमात तुर्केवाडीच्या 'श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'ला तालुक्यात प्रथम क्रमांक; 'गणराया अवॉर्ड'ने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2026

​'एक गाव एक गणपती' उपक्रमात तुर्केवाडीच्या 'श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'ला तालुक्यात प्रथम क्रमांक; 'गणराया अवॉर्ड'ने सन्मानित

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

       कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि चंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'गणराया अवॉर्ड २०२६' अंतर्गत "एक गाव एक गणपती" या अभिनव उपक्रमात तुर्केवाडी येथील 'श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' यांनी चंदगड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मंडळाला मानाचे प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  

        ​गावातील सर्व गट-तटांचे निर्बंध दूर सारून, शांतता, सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासत तुर्केवाडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन समुद्रमंथन हा देखावा व  एक गाव एक गणपती हा उपक्रम आदर्श आणि शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीपणे राबवला. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना पूरक असा गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल पोलीस प्रशासनाने मंडळाचे विशेष कौतुक केले.  

​        हा मानाचा पुरस्कार स्वीकारताना मंडळाचे माजी अध्यक्ष ईश्वर आनंद चौगुले, माजी उपाध्यक्ष  प्रशांत ओऊळकर तसेच तुर्केवाडी गावच्या पोलीस पाटील माधुरी कांबळे उपस्थित होत्या. चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.  या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तुर्केवाडी ग्रामस्थ आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment