चंदगड तालुक्यातील मलतवाडी परिसरात बिबट्या...? शेतकरी वर्गात दहशत, वन विभाग उद्या ड्रोन द्वारे परिसराची पाहणी करणार - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2026

चंदगड तालुक्यातील मलतवाडी परिसरात बिबट्या...? शेतकरी वर्गात दहशत, वन विभाग उद्या ड्रोन द्वारे परिसराची पाहणी करणार

  

संग्रहित छायाचित्र

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

  चंदगड तालुक्यातील मलतवाडी गावच्या हद्दीत जंगली प्राण्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना घडली आहे. हा प्राणी बिबट्या वाघ असण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यावर हल्ला करून त्याला बिबट्याने ठार मारले या कुत्र्याचा बराचसा भाग त्याने खाऊन टाकला असून ही घटना सकाळी शिवारात गेलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. 

    कुत्र्याला ठार मारलेला बिबट्या गावाच्या परिसरातच असण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे, काळामवाडी, कुमरी व चंदगड तालुक्यातील मलतवाडी, लकीकट्टे, मुगळी, सोनारवाडी गावांच्या परिसरात डोंगराळ व जंगल भाग आहे. बिबट्या व अन्य जंगली प्राण्यांना लपून बसण्यासाठी निवारा असल्यामुळे असे प्राणी येथे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने या घटनेची शहानिशा करून उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. ही घटना छायाचित्रासह सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

  याबाबत पाटणे वनविभागाचे अधिकारी वनपाल जॉन्सन डिसोजा यांच्याकडे चौकशी केली असता, ही बातमी खरी असून काही दिवसापूर्वी वाळकुळी, गंधर्वगड परिसरात आढळलेला बिबट्या सध्या मलतवाडी परिसरात आला असण्याची शक्यता व्यक्त केली. वन विभागाचे पथक उद्या रविवारी या जंगल परिसराची ड्रोन द्वारे पाहणी करणार असल्याची माहिती यावेळी बोलताना वनपाल डिसोजा यांनी दिली. ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी, लहान मुलांना शिवारात पाठवून देऊ नये असे आवाहनही वन विभागामार्फत करण्यात आले आहे. दरम्यान याबाबत मलतवाडी ग्रामपंचायत च्या वतीने संस्कार वाहिनी वरून ग्रामस्थांना सावधगिरीच्या सूचना देण्यात येत आहेत.


No comments:

Post a Comment