चंदगड / प्रतिनिधी :
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रमाला २० जून २०२६ पासून सुरुवात झाली असून, २७१ चंदगड विधानसभा मतदारसंघात या मोहिमेची अंमलबजावणी सुरू आहे. सर्व पात्र मतदारांनी आपले गणनापत्रक (Enumeration Form) भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे २९ जुलै २०२६ पूर्वी जमा करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज विभाग एकनाथ काळबांडे यांनी केले आहे.
चंदगड तालुक्यात एकूण २०८ मतदान केंद्रे असून, मतदारांची संख्या १ लाख ६० हजार १७७ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ४५ हजार १०० मतदारांचे सन २००२ मधील आई-वडील किंवा आजी-आजोबा यांच्याशी रक्तसंबंधाचे मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित १५ हजार ७७ मतदारांचे मॅपिंग अद्याप बाकी आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरपोच गणनापत्रकांचे वितरण करण्यात येत आहे. मतदारांनी गणनापत्रकाच्या दोन प्रती अचूक भरून त्यासोबत अलीकडील काळातील रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो जोडून संबंधित BLO यांच्याकडे जमा करावेत. त्यानंतर या माहितीचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, निर्धारित मुदतीत गणनापत्रक जमा न करणाऱ्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाहीत. त्यामुळे भविष्यात मतदार यादीत नाव कायम राहण्यासाठी सर्व मतदारांनी स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांचे गणनापत्रक तातडीने भरून संबंधित BLO यांच्याकडे जमा करावे, असे आवाहन तहसिलदार राजेश चव्हाण यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment