ताम्रपर्णी नदीवरील कोवाड बंधाऱ्यावर मंगळवारी दुपारपासून पाणी, चंदगड बंधाराही पाण्याखाली..! झांबरे धरण बुधवारी रात्रीपर्यंत भरण्याची शक्यता - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2026

ताम्रपर्णी नदीवरील कोवाड बंधाऱ्यावर मंगळवारी दुपारपासून पाणी, चंदगड बंधाराही पाण्याखाली..! झांबरे धरण बुधवारी रात्रीपर्यंत भरण्याची शक्यता


कोवाड येथे ताम्रपर्णी नदीवरील जुना बंधारा मंगळवारी दुपारपासून पाण्याखाली गेला आहे.

 

चंदगड : सी एल वृत्तसेवा

   चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या आठ दिवस धुवांधार पाऊस बरसत आहे. परिणामी तालुक्यातून वाहणाऱ्या ताम्रपर्णी आणि घटप्रभा नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. तालुक्यातील तीन लघुपाटबंधारे धरणांपैकी घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण ४ जुलै रोजीच पूर्ण क्षमतेने भरल्याने ओसंडून वाहत आहे. धरणाच्या सांडव्यावरून ५५८०.८८ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ताम्रपर्णी नदीवरील झांबरे धरण आज मंगळवारी दि. ७ सकाळी सात वाजता ८२ टक्के पेक्षा अधिक भरले असून बुधवारी रात्री हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तिसरे महत्त्वाचे जंगमहट्टी धरणही ५० टक्के पेक्षा अधिक भरले असून या धरणाच्या पातळीतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.  तालुक्यातील कृष्णा खोरे योजनेतील अन्य लघुपाटबंधारे तलावांमध्ये पाणी साठा झपाट्याने वाढताना दिसत आहे. 

   भात पिक रोपे लावण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरत असून तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील सर्व शेतकरी वर्ग भात रोप लावणी कामात व्यस्त दिसत आहे. 

 पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास व ताम्रपर्णी नदीवरील झांबरे धरण भरल्यास तालुक्यात महापूर पुन्हा महापूर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान ताम्रपर्णी  नदीपात्राचे पाणी दाटे नजीकच्या रस्त्याला येऊन भिडले आहे. झांबरे धरण भरल्यानंतर ते केव्हाही रस्त्यावर येऊन बेळगाव- वेंगुर्ले राज्य मार्गावरील वाहतूक खंडित होऊ शकते. दरम्यान पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार चंदगड तालुक्यात ताम्रपर्णी नदीवरील एकूण ४ बंधारे पाण्याखाली गेले असून यात चंदगड, हल्लारवाडी, कोनेवाडी, कोवाड बंधाऱ्यांचा समावेश आहे. चंदगड- हेरे मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक खंडीत झाली असून ती अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. 


कोवाड बाजारपेठेवर पुन्हा महापुराची टांगती तलवार 

      शासन व पाटबंधारे विभागाकडे अनेक वेळा कोवाड ग्रामस्थ तसेच बाजारपेठेतील व्यापारी बंधूंनी दरवर्षी महापुरास कारणीभूत ठरणारा ताम्रपर्णी नदीतील गाळ काढावा अशी मागणी करूनही त्याकडे संबंधितांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. परिणामी सध्या सुरू असलेला पाऊस असाच सुरू राहिल्यास येत्या चार-पाच दिवसात महापुराची टांगती तलवार येथील बाजारपेठेवर लटकलेली दिसत आहे. याबरोबरच या परिसरात शिवारातील भात व ऊस आदी पिके गेले काही दिवस पाण्याखाली असून परिस्थिती अशीच राहिल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. ताम्रपर्णी नदीतील गाळ न काढल्यामुळे नदी काठावरील विविध गावचे शेतकरी, कोवाड येथील व्यापारी बंधू व ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment