हल्लारवाडी बंधाऱ्याचा पिल्लर ढसाळला, वाहतूक बंद झाल्याने ग्रामस्थांना पडणार दहा किमी जादा फेरा - चंदगड लाईव्ह न्युज

13 July 2026

हल्लारवाडी बंधाऱ्याचा पिल्लर ढसाळला, वाहतूक बंद झाल्याने ग्रामस्थांना पडणार दहा किमी जादा फेरा

हल्लारवाडी बंधाऱ्याचा ढासळलेल्या याच पिलर मुळे प्रशासनाकडून पुलावरील वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

संपत पाटील / चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   बेळगाव- वेंगुर्ले हायवे लगत दाटे गावाच्या जवळ ताम्रपर्णी नदी पलीकडच्या हल्लारवाडी, करंजगाव आदी गावांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा गेली अनेक वर्षे दाटे  परिसरातील नागरिकांना सेवा देत होता. तथापि या महत्त्वपूर्ण बंधाऱ्याचा एक पिलर नुकताच ढासळला आहे. बंधारा वाहतुकीस धोकादायक बनल्याने प्रशासनाने बंधाऱ्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी या बंधाऱ्यावर अवलंबून असल्या असणाऱ्या परिसरातील अनेक गावातील नागरिकांचे हाल होणार आहेत.

    बेळगाव- वेंगुर्ला राज्य मार्गाच्या जवळून वाहणाऱ्या ताम्रपर्णी नदी पलीकडे हल्लारवाडी, करंजगाव, तसेच नांदवडे, शिप्पूर, कोळिंद्रे, आंबेवाडी सह हेरे पर्यंत अनेक गावे आहेत. या गावांना राज्य मार्गावरील दाटे येथे येण्यासाठी हा मार्ग सोयिस्कर होता. शिवाय नदीपलीकडे दाटे व बेळेघाट येथील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत हल्लारवाडी बंधाऱ्यामुळे शेती कामासाठी ये जा करणे सहज सोपे होते. मात्र हा मार्ग बंद झाल्याने शेतकऱ्यांना दहा किलोमीटर अंतरावरून हलकर्णी मार्गे किंवा कोनेवाडी, नागणवाडी बंधाऱ्यावरून जावे लागणार आहे. यामुळे शेतकरी व नागरिकांना वेळ व पैसा वाया जाणार आहे. परिणामी या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या ग्रामस्थांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. परिसरातील ग्रामस्थांसह या मार्गावरून विविध कामांसाठी रोज शेकडो वाहने ये जा करत होती. हे सर्व वाहतूक पुढील कारवाई होईपर्यंत ठप्प राहणार आहे. बंधाऱ्याची दुरुस्ती होऊन पुन्हा वाहतूक केव्हा सुरू होईल याकडे येथील शेतकरी व ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments:

Post a Comment