पाऊस पाण्याअभावी चंदगड तालुक्यातील भातरोप लावणी रखडली, माळरानावरील पिके धोक्यात - चंदगड लाईव्ह न्युज

13 July 2026

पाऊस पाण्याअभावी चंदगड तालुक्यातील भातरोप लावणी रखडली, माळरानावरील पिके धोक्यात


पावसाने दडी मारल्याने उन्हामध्ये वाळत असलेला तरवा

संपत पाटील / चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    गेले आठ दिवस मान्सूनच्या पावसाने अचानक दडी मारल्यामुळे चंदगडच्या पूर्वेकडील कर्यात भागासह संपूर्ण तालुक्यातील भातरोप लावणीला ब्रेक लागला आहे. तीन-चार दिवसातील कडक उन्हामुळे पाणथळ शिवारही कोरडे पडू लागले आहेत. पावसा अभावी माळरानातील लावणी केलेली भात पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

कालकुंद्री येथील शिवारात आहेत्या परिस्थितीत भात रोप लावणी उरकून घेण्याच्या घाईत असलेले शेतकरी व महिला

    जून महिन्यातील शेवटचे दोन दिवस व जुलैचा पहिला आठवडा पावसाने चंदगड तालुक्याला झोडपून काढले होते. यामुळे शेतकरी आनंदित झाला होता. या पावसामुळे तालुक्यातील तीन पैकी घटप्रभा नदीवरील फाटकवाडी व ताम्रपर्णी नदीवरील झांबरे धरण ओव्हर फ्लो झाले. तर तिसरे महत्त्वाचे धरण असलेल्या जंगमहट्टी धरणात ६६% पाणीसाठा झाला आहे. याशिवाय कृष्णा खोरे योजनेतील १८ लघु पाटबंधारे धरणांपैकी कळसगादे तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून उर्वरित तलावही भरण्याच्या मार्गावर होते. आणखी दोन-तीन दिवस पाऊस सुरू राहिला असता तर यापैकी बरेच प्रकल्प १००% भरले असते. तथापि ८ जुलै २०२६ नंतर पावसाने ओढ दिली आणि गेल्या तीन-चार दिवसात उन्हाळा सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शिवारात साठलेले पाणी गायब झाले. यामुळे भारताच्या रोप लावणीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी नदीकाठावरील मोटर पंप च्या माध्यमातून शेतात पाणी सोडून रोप लावणी केली असती तथापि ताम्रपर्णी नदी ला महापुराच्या धोका वाढल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपापले मोटर पंप काढून ठेवले आहेत. आत्ता पाऊस पण नाही व मोटर पाईप लाईनचे पाणी पण सोडता येत नाही. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. काही शेतकऱ्यांनी घाई करून शिवारातील पाणी आटण्यापूर्वी रोप लावणी आटपून घेतली. पण बहुतांशी रोप लावणी अजून रखडलेल्या अवस्थेत आहे. येत्या चार दिवसात पाऊस न झाल्यास झालेल्या रोप लावणी सह उर्वरित लावणीच्या प्रतीक्षेतील रोपांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या रखरखीत उन्हामुळे त्रासलेला बळीराजा पावसासाठी कधी नव्हे ते हवामानाच्या अंदाजाकडे व आभाळाकडे लक्ष लावून बसला आहे.

No comments:

Post a Comment