मजरे कारवे येथील मंजूर झालेले अप्पर तहसीलदार कार्यालय इतरत्र न हलवता त्याच ठिकाणी कार्यन्वीत करा, निवेदनातून मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2026

मजरे कारवे येथील मंजूर झालेले अप्पर तहसीलदार कार्यालय इतरत्र न हलवता त्याच ठिकाणी कार्यन्वीत करा, निवेदनातून मागणी

चंदगड : तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देताना माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह नागरीक व पदाधिकारी

चंदगड : प्रतिनिधी

चंदगड तालुक्यातील मौजे मजरे कारवे येथे शासनाने मंजूर केलेले अप्पर तहसीलदार कार्यालय अन्यत्र स्थलांतरित न करता त्याच ठिकाणी तात्काळ कार्यान्वित करावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, तालुक्याच्या भौगोलिक, प्रशासकीय व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने मजरे कारवे हेच सर्वाधिक योग्य ठिकाण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन आज माजी आमदार राजेश पाटील, सभापती प्रा. विलास नाईक, माजी जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण, पंचायत समिती सदस्य पांडुरंग बेनके, तालुका संघाचे उपाध्यक्ष तानाजी गडकरी, युवाशक्तीचे तालुका-प्रमुख मायाप्पा पाटील यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांना दिले. 

निवेदनात म्हटले आहे की, चंदगड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत विस्तीर्ण, डोंगराळ व कर्नाटक सीमेलगतचा दुर्गम तालुका असून सुमारे दोन लाख लोकसंख्या येथे वास्तव्यास आहे. तालुक्यातील अनेक गावे मुख्यालयापासून ६० ते ७० किलोमीटर अंतरावर असल्याने महसूल विभागाच्या विविध कामांसाठी नागरिकांना मोठा वेळ आणि खर्च करावा लागतो.

तालुक्यात १५५ महसुली गावे, ३७ तलाठी सजा, ६ मंडळे आणि ३८ नागरी सुविधा केंद्रांमार्फत सेवा दिली जाते. दरवर्षी १० हजारांहून अधिक विविध दाखले वितरित केले जातात. तसेच जमीन खरेदी-विक्री, वारस नोंदी, फेरफार आणि न्यायालयीन प्रकरणांचा मोठा भार एकाच तहसील कार्यालयावर असल्याने कामकाजावर ताण वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी सादर केलेल्या अहवालानुसार मजरे कारवे हे तालुक्याच्या दृष्टीने मध्यवर्ती आणि प्रशासकीयदृष्ट्या सोयीचे ठिकाण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोवाड, माणगाव आणि तुर्केवाडी मंडळांचा समावेश या कार्यालयात केल्यास नागरिकांना अधिक जलद आणि सुलभ सेवा उपलब्ध होईल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मजरे कारवे येथे जलसंपदा विभागाची सुमारे पाच एकर जागा उपलब्ध असून, आवश्यक असल्यास तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर जागाही उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे कार्यालय सुरू करण्यासाठी कोणतीही भौतिक अडचण नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, मंजूर झालेले अप्पर तहसीलदार कार्यालय अन्यत्र स्थलांतरित करण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत असून, असे झाल्यास शासनाच्या निर्णयाचा मूळ उद्देशच निष्फळ ठरेल आणि दुर्गम भागातील नागरिकांना पुन्हा अडचणींचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

त्यामुळे शासनाने लोकहिताचा विचार करून मौजे मजरे कारवे येथे मंजूर झालेले अप्पर तहसीलदार कार्यालय तात्काळ कार्यान्वित करावे, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देताना निट्टूरचे सरपंच गुलाब पाटील, जगन्नाथ हुलजी, नारायण कणुकले, सूर्यकांत पाटील, यशवंत पतसंस्थेचे चेअरमन विनोद पाटील,  एस. एल. पाटील  यांच्यासह नागरीक व पदाधिकारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment