
कोल्हापूर : कोल्हापूर व चंदगडचे पोलीस अधिकारी व कर्मचारी
चंदगड : सी एल वृत्तसेवा
दि. 29/05/2026 रोजी सकाळी कोदाळी ते दोडामार्ग यादरम्यान तिलारी घाटात प्रेशर पाँईट रोडचे बाजूला जंगली झाडा झुडपामध्ये कोदाळी गावचे हद्दीत (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे बेवारस स्त्री जातीचे अनोळखी महिलेचा मृतदेह वय अंदाजे 30 ते 35 वर्षे मिळून आला होता. याबाबत खुनाचा गुन्हा नोंद झाला होता.
पोस्टमार्टम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन स्टीलच्या शॉक ऑप्सॉर्बर पाईपने अथवा तत्सम हत्याराने महिलेच्या डोक्यावर मारहाण करुन खुन केल्याची खात्री व्यक्त केली. पुरावा नष्ट करण्याचे हेतूने सदर महिलेचा मृतदेह जंगलामध्ये टाकून दिला असल्याचे मयताचे तपासामध्ये निष्पन्न झालेले चंदगड पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांनी तपास गतीने सुरू केला.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नीलोत्पल साो, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना गुन्हयाचे ठिकाणी भेट देवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे व चंदगड पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक विजय कोळेकर व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन तपास गतिमान केला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी यातील अनोळखी मयत महिलेचे घटनास्थळावरील फोटो, तीचे अंगावरील कपडे, दागीने व घटनास्थळावरुन मिळून आलेल्या इतर वस्तू यावरुन मयत महिलेची ओळख पटविणे व तीचे नातेवाईकांचा शोध घेणेसाठी कोल्हापूर जिल्हयातील 30 ते 35 वयोगटातील महिला मिसींग प्रकरणांची माहिती संकलित करणेचे काम केले. तदनंतर कोल्हापूर जिल्हयाचे सीमेलगत असलेल्या सांगली, सिंधुदुर्ग जिल्हयातील तसेच कर्नाटक व गोवा राज्यातील 199 मिसींग महिलांची माहिती संकलित करुन मयत महिलेचे ओळख पटविणेचा प्रयत्न केला. याचशिवाय तिलारीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचे काम सुरु ठेवले.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिनांक 25/05/2026 रोजी तिलारी ते दोडामार्ग असे तिलारी घाटातमध्ये एक संशयास्पद कुझर गाडी जाताना निदर्शनास आली. सदरची गाडी अवघ्या वीस मिनिटांत घाटातून पुन्हा वरीत येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर कुझर गाडीचा अपघात झाल्याची तपास पथकाने सातत्याने सीसीटीव्ही फुटेजचा फॉलोअप घेतला. सदर गाडीबद्दल पुर्ण माहिती प्राप्त केली परंतू अपघातामध्ये गाडीचा चालक हा जखमी होवून उपचार घेत असलेने तपास पथकास त्याचेकडे तपास करता आला नाही.
पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेजवर लक्ष केंद्रीत करुन तपास केला असता बेळगावमध्ये यातील मयत महिला पल्सर मोटर सायकलवरुन संशयित आरोपी सोबत जात असताना दिसून आली. तदनंतर तपास पथकाने बेळगाव ते हुबळी असा 110 किमी अंतर सीसीटीव्ही फुटेजव्दारे पल्सर मोटर सायकलचा फॉलोअप घेवून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता सदर महिलेस पल्सरवरुन कुझर गाडीपर्यत सोडणारे इसमाचे नाव बसवराज येलाप्पा करणावर रा. राजकुट्टी, ता. जि. बेळगाव, राज्य कर्नाटक असे असलेचे समजले.
दरम्यान तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे, विजय इंगळे, तुकाराम राजीगरे यांना संशयित बसवराज हा त्याचे साथीदारांसह त्याचेकडील पल्सर मोटर सायकलवरून शिनोळी, ता. चंदगड परिसरात वावरत आहे अशी गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सपोनि सागर वाघ, पोउपनि शेष मोरे यांचे पथकाने शिनोळी, ता. चंदगड येथे सापळा लावून नमुद पल्सर मोटर सायकलसह तीघांना ताबेत घेतले. त्यांना त्याचे नाव व पत्ते विचारले असता त्यांनी आपली नावे 1) यल्लाप्पा महिलाप्पा करणावर वय 57, रा. राजकट्टी, तालुका हुक्केरी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक 2) बसवराज यल्लाप्पा करणावर वय 33, रा. राजकट्टी, तालुका हुक्केरी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक 3) लगमाप्पा लगमाप्पा अंकलगी वय 37, रा. केंचनट्टी, ता. जि. बेळगाव, राज्य कर्नाटक अशी असलेचे सांगितले. त्यांचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्यांनी यातील मयत महिला नामे गंगव्वा सत्त्याप्पा हंचीमणी वय 25, रा. वंटमोरी, ता. जि. बेळगाव, राज्य कर्नाटक हिचा तिलारी घाटामध्ये घेवुन जावुन खुन केला असलेची कबूली दिलेली आहे. यातील तीन आरोपी व जप्त मोटर सायकल गुन्हयाचे पुढील तपास कामी चंदगड पोलीस ठाणेच्या ताबेत दिलेली आहे. यातील कुझर गाडीवरील चालकाचे अपघातामध्ये खांदयाचे हाड मोडलेले असून तो घरी उपचार घेत असल्याने त्याला ताब्यात घेता आलेले नाही.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल भा.पो.से., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव म.पो.से., मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री रामदास इंगवले म.पो.से. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखडे, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उप निरीक्षक विजय कोळेकर, शेष मोरे, अतिष म्हेत्रे पोलीस अंमलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे, विजय इंगळे, समीर कांबळे, संजय कुंभार, तुकाराम राजीगरे, युवराज पाटील, अनिल जाधव, अरुण धनगर, सागर चौगले, आनंदा नाईक, राम पाटील, सुशिल पाटील यांचे पथकाने केली आहे.
No comments:
Post a Comment